पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 06:59 IST2025-07-10T06:58:47+5:302025-07-10T06:59:22+5:30

आजवर गर्दीचे अनेक कार्यक्रम झाले. ठिकठिकाणी यात्रा होतात. कुंभमेळा भरतो. मात्र, एआयचा असा प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदाच झाला. आता तो सर्वदूर करता येणे शक्य आहे.

AI did the magic of counting the crowd of 27 lakh people at Pandharpur Wari | पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया

पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया

‘अणुरेणुया थोकडा तुका आकाशाएवढा’, असे सांगणाऱ्या संत तुकारामांचा जयघोष जी आषाढी वारी करते, तिच्या व्यवस्थापनासाठी साक्षात एआयनेच वारकरी होणे स्वाभाविक मानायला हवे. आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भाळी असणारा टिळा! इतकी वर्षे लोटली, पण ही परंपरा सुरू आहे. अधिक ताजेपण सोबत घेऊन आणखी तेजस्वी होते आहे. तुकाराम-ज्ञानेश्वरांची भाषा ही संविधानाची भाषा आहे, हे नव्या पिढीला समजू लागले आहे. आयटीतल्या तरुणाईला दिंडीचे व्यवस्थापन खुणावू लागले आहे. भक्तीचा असा जल्लोष कुठेच पाहिला नव्हता, असे परदेशी पर्यटक सांगू लागले आहेत. भेदाभेद, भ्रम विसरून माणसं धावत सुटतात आणि भक्तिधारेत चिंब भिजतात, हे दृश्यच अनवट आहे.

वादळ असो वा पाऊस, या वारकऱ्यांना कोणी अडवू शकत नाही. पन्नास वर्षांपासून चालणारे वारकरी यंदाच्या वारीत दिसत होते, तसेच अगदी पहिल्यांदा पाऊल ठेवलेले तरुण होते. काळ बदलला. देहू-आळंदीकडून पंढरीकडे जाणाऱ्या वाटा बदलल्या. साधने बदलली. मात्र, आषाढी वारीतील भक्ती ओसरली नाही. यावेळी आषाढी वारीच्या व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वाटा मोठा होता. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे पुणे विभागाचे आयुक्त. “नव्या साधनांचा वापर करून मानवी समुदायाची चिरंतन मूल्ये टिकवली पाहिजेत”, असे त्यांनी सांगितले. प्रशासनाने यावेळी ते करून दाखवले. असे अभिनंदनाचे प्रसंग कमी येतात. मात्र, यावेळी जे घडले त्याचा व्यवस्थापन म्हणूनही अभ्यास झाला पाहिजे. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात सत्तावीस लाख भाविक आले. ही गर्दी मोजण्याची किमया केली एआयने. या गर्दीचे अचूक नियोजन, आपत्कालीन काळात भाविकांना तातडीची मदत, सुरक्षेसाठी सजग यंत्रणा हे सारे एआयने केले. ‘जिवंत जनसागराला कृत्रिम बुद्धिमत्तेने सांभाळले’, हे वरवर पाहता अंतर्विरोध वाटू शकणारे वाक्य. मात्र, तसे घडले. भाविक, पोलिस, जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वय ठेवला तो एकात्मिक आदेश आणि नियंत्रण कक्षाने. ती यंत्रणा उभी करण्यात एआयचा वाटा फार मोठा.

आजवर गर्दीचे अनेक कार्यक्रम झाले. ठिकठिकाणी यात्रा होतात. कुंभमेळा भरतो. मात्र, एआयचा असा प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदाच झाला. आता तो सर्वदूर करता येणे शक्य आहे. मुख्य म्हणजे, कुंभमेळ्याचे व्यवस्थापन या पद्धतीने करता येईल, ही महत्त्वाची बातमी आहे. आपत्ती व्यवस्थापनातही एआयचा योग्य त्या प्रकारे उपयोग झाला तर मोठा ताण हलका होईल. आषाढी यात्रेच्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआय आणि टूजी मोबाइल पॅटर्न संकल्पना राबवण्यात आली. हाच पॅटर्न आता नाशिकच्या कुंभमेळ्यात राबवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. आपल्यासारख्या देशात एवढी प्रचंड लोकसंख्या असताना एआय करणार तरी काय, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होत असतो. त्या मुद्याला अनेक बाजू आहेत. मात्र, या अफाट लोकसंख्येच्या व्यवस्थापनासाठीही एआय महत्त्वाचे आहे, हे या निमित्ताने स्पष्ट झाले. लोकसंख्या वाढत आहे आणि व्यवस्थापन ही सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट आहे. हे फक्त वारी वा कुंभमेळ्यापुरते नाही.

आज मुंबईची लोकसंख्या दोन कोटींवर गेली आहे, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एक कोटी लोक राहतात. अशा शहरांच्या व्यवस्थापनासाठीही एआयचा उपयोग आता करता येऊ शकेल. तसे झाले तर, शहर नियोजनाचे संदर्भ आमूलाग्र बदलून जाणार आहेत. मुख्यमंत्री म्हणाले त्याप्रमाणे सुशासन आणि प्रशासनासाठी एआय साहाय्यभूत ठरणार आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर काय घडू शकते, याचा पुरावा म्हणून आषाढी वारीकडे पाहायला हवे. अर्थात, आषाढीच्या प्रकृतीशी एकूण सुसंगत असेच हे आहे. 
जाणीव जेथ न रिघे। विचार मागता पाऊली निघे।
तर्क आयणी नेघे। अंगी जयाच्या।
अर्जुना, तया नाव ज्ञान। येर प्रपंच हे विज्ञान।
तेथ सत्यबुद्धी ते अज्ञान। हेही जाण! 
‘ज्ञानेश्वरी’च्या सातव्या अध्यायात हे सांगताना, ज्ञानदेवांना ही खात्री असणार की गोंधळलेल्या अर्जुनांना विज्ञानच अखेर वाट दाखवणार आहे. पंढरीच्या वाटेला आज नवजात एआयच्या वाटा येऊन मिळाल्या आहेत हे खरे; पण तंत्रज्ञानाचे फायदे घेताना, संत ज्ञानेश्वर म्हणतात, त्या विज्ञानाचा आणि विवेकाचा मूळ गाव मात्र हरवता कामा नये!

Web Title: AI did the magic of counting the crowd of 27 lakh people at Pandharpur Wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.