संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 08:11 IST2025-12-13T08:11:48+5:302025-12-13T08:11:48+5:30
चाळीस वर्षांहून अधिक काळ सत्तेच्या परिघात राहूनही संन्यस्तासारखे निर्लेप, निर्मळ आणि निर्मोही असणे हल्लीच्या काळात तसे दुर्मीळच. लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशी महत्त्वाची पदे भूषविलेले शिवराज पाटील-चाकूरकर हे त्यापैकी होते!

संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
चाळीस वर्षांहून अधिक काळ सत्तेच्या परिघात राहूनही संन्यस्तासारखे निर्लेप, निर्मळ आणि निर्मोही असणे हल्लीच्या काळात तसे दुर्मीळच. लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशी महत्त्वाची पदे भूषविलेले शिवराज पाटील-चाकूरकर हे त्यापैकी होते! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री हा त्यांचा राजकीय प्रवास नदीच्या प्रवाहासारखा नितळ, स्फटिकासारखा पारदर्शक आणि नैतिकतेचा आदर्श वस्तुपाठ ठरावा असा आहे. त्यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीत कसलेही डावपेच नव्हते. लबाडी नव्हती. तत्त्वांशी, निष्ठेशी आणि राजकीय विचारधारेशी तडजोड नव्हती. आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी जे एकनिष्ठ राहिले, त्या निष्ठावंत पिढीचे ते प्रतिनिधी होते. मुळात, त्यांचा पिंड राजकीय नव्हता. निष्णात विधिज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक असतानाच्या काळात केवळ लोकाग्रहास्तव ते लातूरचे नगराध्यक्ष झाले. पुढे आमदार आणि तब्बल सात वेळा ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळात त्यांनी संरक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, वाणिज्य अशा विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे मंत्री म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) अत्याधुनिक बनविण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले.
लोकसभाध्यक्ष पदावरील त्यांची कारकीर्दही उल्लेखनीय ठरली. लोकसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, संसदीय कामकाजाचे संगणकीकरण, संसद ग्रंथालयाची इमारत आणि उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार आदी उपक्रम त्यांच्याच कारकिर्दीत सुरू झाले. ते लोकसभाध्यक्ष असताना अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, सुषमा स्वराज्य, जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव यांसह डाव्या पक्षातील दिग्गज नेते विरोधकांच्या बाकांवर होते. मात्र, चाकूरकर यांनी या सर्वांचा तितकाच सन्मान राखला. नरसिंह राव यांच्या सरकारला अडचणीत आणण्याचे, कोंडीत पकडण्याचे अनेक वादळी प्रसंग घडले, पण त्यांनी अतिशय संयमाने परिस्थिती हाताळली. सभागृह चालवण्याची त्यांची विलक्षण हातोटी पाहून अटलजी एकदा मिश्कीलपणे म्हणाले, ‘शिवराजजी, आपने इस सभागृह की गरिमा बढाई हैं, इसी पदपर हमेशा बने रहो!’ अटलजींच्या या वाक्याने सभागृहात एकच हशा पिकला. पण, ती चाकूरकरांच्या निष्पक्षतेला मिळालेली प्रशस्त दाद होती! ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष असतानाचा एक प्रसंग. देशातील एका मोठ्या नेत्याचे निधन झाल्याचे वृत्त सभागृहात आले. सदस्यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडण्याचा आग्रह केला. चाकूरकर म्हणाले, ‘परिवाराकडून अधिकृत घोषित होईपर्यंत आपण प्रतीक्षा केली पाहिजे!’ झालेही तसेच. या प्रसंगानंतर चार दिवसांनी त्या नेत्याचे देहावसान झाले. तो काळ असा होता की, खासदार अथवा मंत्र्यांच्या शिफारशीशिवाय टेलिफोन अथवा स्कूटर मिळत नसे. त्यांच्याकडे तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी असताना, एकाने टेलिफोनसाठी त्यांना आग्रह केला. त्यावर ते म्हणाले, ‘मी वैयक्तिक शिफारस करू शकत नाही. तुम्हाला टेलिफोन हवा असेल, तर तुमच्या गावासाठी टेलिफोन एक्सचेंजची मागणी करा!’ इतका तत्त्वनिष्ठ राजकारणी विरळाच. सार्वजनिक जीवनात असूनही शिवराज पाटलांनी कधीच कोणाचा द्वेष केला नाही. निवडणुकीतील प्रचारात विरोधकांवर टीका-टिप्पणी, आरोप करण्याऐवजी ते सरकारच्या कामगिरीवर, भारताच्या भवितव्यावर बोलत असत. प्रचाराच्या रणधुमाळीत अशा प्रबोधनात्मक भाषणांना कशी दाद मिळणार? म्हणून मग विलासराव देशमुख किल्ला लढवत.
समाजवादी नेते बापूसाहेब काळदाते यांनी एका भाषणात चाकूरकरांना भाकड गाईची उपमा दिली. यावर काही निकटवर्तीयांनी प्रतिक्रिया विचारली असता, स्मितहास्य करत म्हणाले- ‘बापूंनी मला गाय म्हटले?, मी नशिबवान आहे!’ निवडणुकीच्या निकालादिवशी ते गीतेतील कर्मयोग वाचत असत. हार-जीतच्या पलीकडची विलक्षण स्थितप्रज्ञता त्यांच्या ठायी होती. काँग्रेस पक्ष, गांधी घराण्याशी ते एकनिष्ठा होते. म्हणूनच, २००४ साली लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले तरी, सोनिया गांधी यांच्या आग्रहापोटी ते देशाचे गृहमंत्री झाले. दुर्दैवाने २६/११ची घटना घडली. या दहशतवादी हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून जबाबदारी पार पाडली. अत्यंत अभ्यासू, मितभाषी आणि सौजन्यशील ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. अध्यात्मात त्यांना रुची होती. पुट्टपर्थी सत्यसाईबाबांचे ते निस्सीम भक्त होते. डाव्या पक्षांनी त्यांच्या या ‘धार्मिक’ बाजूवर आक्षेप घेतला नसता, तर कदाचित ते पंतप्रधान झाले असते! चाकूरकर यांच्या निधनाने आपण एका सुसंस्कृत, सौजन्यशील व्यक्तिमत्त्वाला मुकलो आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली !