एक भाजप X तीन शिवसेना; जागा वाटपावेळी भावनेला स्थान नसते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 07:34 IST2025-07-07T07:30:32+5:302025-07-07T07:34:26+5:30

‘भाऊबंदकी’ हा विषय मराठी कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट इतकेच काय सिरीयल अन् वेबसिरीज यांना वर्षानुवर्षे खाद्य पुरवत आला. कित्येक बायकांचे पदर या विषयाने ओले केले.

Agralekh One BJP vs three Shiv Sena | एक भाजप X तीन शिवसेना; जागा वाटपावेळी भावनेला स्थान नसते

एक भाजप X तीन शिवसेना; जागा वाटपावेळी भावनेला स्थान नसते

‘भाऊबंदकी’ हा विषय मराठी कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट इतकेच काय सिरीयल अन् वेबसिरीज यांना वर्षानुवर्षे खाद्य पुरवत आला. कित्येक बायकांचे पदर या विषयाने ओले केले. साधारणपणे नाटक व चित्रपट यांचा शेवट सुखांत करायचा असल्याने भाऊबंदकीला तिलांजली देऊन कुटुंब एकत्र आल्याचे अनेक कलाकृतींमध्ये आपण पाहिले. मात्र, सर्वसाधारणपणे नाते हे काचेच्या भांड्याप्रमाणे असते. त्याला एकदा तडा गेला की सांधता येत नाही. राजकारणात तर नाते तुटले की तुटले, अशी टोकाची भावना असते. कारण राजकीय नेत्याभोवती ‘बडव्यां’चे कोंडाळे असते. हे कोंडाळे नेत्यांना परस्परांच्या जवळ येऊच देत नाही. मात्र, तरीही उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी हिंदीचा विरोध आणि मराठीचे हित या मुद्द्यावर अखेर हातमिळवणी केली. ठाकरे बंधूंना एकमेकांचा ‘सन्माननीय’ असा उल्लेख करताना पाहून  भरजरी साड्यांत आलेल्या महिला कार्यकर्त्या हमसाहमशी रडू लागल्या. पुरुष कार्यकर्ते विजयी चित्कार करत होते. हे चित्र दोन्हीकडील सैनिकांकरिता आशादायक होते. मात्र, जेव्हा राजकारणात जागांच्या वाटपाला पक्षाचे नेते बसतात, तेव्हा भावनेला स्थान नसते.  वैचारिक आधार तुटून राजकारण स्वार्थी, तात्कालिक व आपमतलबी होते तेव्हा तर राजकारणातील पक्ष व नेते फार दूरचा विचार करत नाहीत.

  उद्धव यांच्याकडे आजमितीस २० आमदार व महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांत नगरसेवक आहेत. त्या तुलनेत राज यांची पाटी कोरी आहे. उद्धव व राज यांच्या पक्षाचे नगरसेवक, मातब्बर स्थानिक नेते फोडण्याचा प्रयत्न भाजप व शिंदेसेना निकराने करणार आहे. या पार्श्वभूमीवर या दोघांना निवडणूक लढवावी लागेल, याचे भान मुख्यत्वे उद्धव यांना ठेवायचे आहे. भाजप व शिंदेसेना हा उद्धव यांचा मुख्य शत्रू असला, तरीही युतीच्या राजकारणाचे धडे उद्धव यांना भाजपकडून घ्यावे लागतील. २०१९ च्या निवडणुकीत भाजप व शिवसेना यांना मतदारांनी कौल दिला. त्यानंतर शरद पवार व राहुल गांधी यांच्या मदतीने उद्धव यांनी मुख्यमंत्रिपद मिळवले. भाजपच्या हातातोंडाशी आलेला मुख्यमंत्रिपदाचा घास हिरावला. भाजपने थंड डोक्याने शिवसेना फोडली आणि उद्धव यांचे सरकार घालवले. भाजपकडे बहुमत असताना (छातीवर दगड ठेवून) एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले. तब्बल अडीच वर्षे शिंदे व त्यांच्या मंत्र्यांची  मनमानी सहन केली. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपद ताब्यात आल्यावर मात्र वचपा काढला. गेल्या काही दिवसांत भाजप व शिंदेसेना यांच्यात वरचेवर खटके उडताना दिसत आहेत.

  या पार्श्वभूमीवर  ठाकरे बंधू आपल्या मनोमीलनाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देतात तेव्हा त्यामधील वक्रोक्ती दुय्यम ठरून राजकीय डावपेचांची चर्चा सुरू होणे अपरिहार्य आहे. शिंदे यांचे राज्यातील विधानसभा व ठाण्यासह मुंबई महानगर क्षेत्रातील संख्याबळ खच्ची करणे ही भाजपची गरज तर झालेली नाही ना, असा संशय घ्यायला वाव आहे. हिंदुत्वाच्या आधारावरील एकच पक्ष हे भाजपने कधी न लपवलेले स्वप्न आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर शिंदेसेना व उद्धवसेनेचे आजमितीस ८०च्या आसपास आमदार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनाही हयातीत एवढे आमदार निवडून आणता आलेले नाहीत. राज ठाकरे यांचा करिष्मा वेगळा. अजित पवार व शरद पवार यांचे सवतेसुभे विचारात घेता फोडलेले पक्ष अमिबासारखे वाढत आहेत. त्यामुळे अगोदर भाजपसोबत राहून मोदीरस शोषून वाढलेल्या पक्षांना छाटणे ही तर भाजपची गरज झालेली नाही ना?  ठाकरे बंधू एकत्र येण्याशी भाजपचा संबंध असो-नसो, सर्वसामान्य शिवसैनिक यामुळे सुखावला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर भरभक्कम सत्ता मिळवण्याची भाजपची इच्छा आहे. तसे झाल्यास दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजप हाच परवलीचा शब्द असेल. मुंबईवरील ताबा सुटेल, अशी भीती ठाकरेंना वाटते. त्यामुळे उद्धव व राज यांच्या युतीला ९० ते १०० जागा मिळाल्या तर भाजपची बहुमताची वाट रोखता येईल. तीन तुकडे होऊनही शिवसेना संपत नाही, तिचे संख्याबळ घटत नाही हे भाजपचे दुखणे आहे. भाजपचा वाढता विस्तारवाद हे तिन्ही शिवसेनांचे दुखणे आहे. महापालिकांमधील निवडणूक भाजप व तीन शिवसेनांमध्ये होणार आहे.

Web Title: Agralekh One BJP vs three Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.