पर्यटकांनो या; पण सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 06:50 IST2025-05-02T06:48:34+5:302025-05-02T06:50:14+5:30

गोव्यात पर्यटकांची संख्या यापुढे अधिक वाढणार आहे. मे महिना हा सुट्टीचा काळ. विद्यार्थ्यांना, शाळांना सुट्टी. त्यामुळे पालकही मुद्दाम दैनंदिन कामापासून दूर राहतात व मुलांना घेऊन हॉलिडे अनुभवतात. आता देशभरातील पर्यटकांचे पाय गोव्याकडे वळतील.

agralekh Goa tourist | पर्यटकांनो या; पण सावधान!

पर्यटकांनो या; पण सावधान!

गोव्यात पर्यटकांची संख्या यापुढे अधिक वाढणार आहे. मे महिना हा सुट्टीचा काळ. विद्यार्थ्यांना, शाळांना सुट्टी. त्यामुळे पालकही मुद्दाम दैनंदिन कामापासून दूर राहतात व मुलांना घेऊन हॉलिडे अनुभवतात. आता देशभरातील पर्यटकांचे पाय गोव्याकडे वळतील. पहलगाम-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे हजारो पर्यटकांनी काश्मीरची आपली भेट रद्द केली. मोठ्या प्रमाणात देशभरातून बुकिंग रद्द झाले. अशावेळी गोव्यासह अन्य पर्यटनस्थळांकडे हे पर्यटक जाणार आहेत. गोवा म्हणजे देवभूमी. सुंदर सुबक मंदिरे, पोर्तुगीजकालीन वास्तुशास्त्राची छाप असलेली देखणी घरे, पांढरी शुभ्र चर्चेस आणि रूपेरी वाळूचे किनारे यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना गोवा जास्त आवडतो. फेसाळत्या लाटा आणि अगदी निळ्याशार पाण्याचे समुद्र, डोलणारे माड हे सगळे काव्यमय दृश्य पर्यटकांना भुरळ घालते. यामुळेच वार्षिक सरासरी एक कोटीहून अधिक पर्यटक ह्या छोट्याशा राज्यात येऊन जातात. येथील खाद्य संस्कृती व पाहुणचाराच्या पद्धतीने जगभरातील पर्यटकांना मोह घातलेला आहे.

गोव्यात पर्यटकांनी यावेच, असे गोवा सरकारचे म्हणणे आहे; पण शिस्तीचे पालनही करावे, असा सल्लाही दिला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अलीकडेच काही विधाने केली. गोव्यात येणारे देशी पर्यटक हे सोबत स्टोव्ह, स्वयंपाक गॅस वगैरे घेऊन येतात. उघड्यावरच स्वयंपाक तयार करतात. अशा पर्यटकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिलेले आहेत. पर्यटकांची सतवणूक करण्याची गोव्याची इच्छा नाही; पण, शेतात व रस्त्याच्या बाजूला जे पर्यटक स्वयंपाक करतात त्यातून गोव्याची प्रतिमा मलिन होत आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यटन राज्य असलेल्या प्रदेशाला हे शोभत नाही. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी उघड भूमिका घेतली. पर्यटक रस्त्याच्या बाजूला स्वयंपाक करून अस्वच्छता निर्माण करतात, कचरा इथे-तिथे फेकतात हे सगळे बंद केले जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाच आहे. त्यामुळे गोव्यात येणाऱ्या काही पर्यटकांना अधिक काळजी घ्यावी लागेल.

केरळपासून गुजरात, राजस्थान, तामिळनाडूपर्यंतचे पर्यटक बसगाड्यांमधून येतात. उत्तर गोव्यातील मिरामार, कळंगुट, बागा, सिकेरी, कांदोळी, आश्वे, मोरजी येथे तसेच दक्षिण गोव्यातील कोलवा, पाळोळे येथे पर्यटक जास्त संख्येने जातात. तिथे रस्त्याच्या बाजूला बसून यापुढे स्वयंपाक करता येणार नाही. पर्यटकांना स्थानिक संस्कृतीशीही जुळवून घ्यावे लागेल. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासही गोव्यात मनाई आहे. मध्यंतरी पोलिसांनी अशा अनेक पर्यटकांविरुद्ध एफआयआर नोंद केले आहेत. किनाऱ्यावर बसून दारू ढोसणाऱ्या पर्यटकांविरुद्ध यापूर्वी पोलिसांनी मोहीम राबवली होती. आता नव्याने हे प्रकार सुरू झाले आहेत. काही जण मद्याच्या रिकाम्या बाटल्या मग किनाऱ्यावरच फोडून टाकतात. हे अन्य पर्यटकांसाठी व त्यांच्या मुलांसाठी धोकादायक आहे. किनाऱ्यावर पहाटे फिरणारे, योगा करणारे पर्यटक हे अशा मद्यपी व उपद्रवी पर्यटकांना कंटाळत आहेत. पर्यटकांची गोव्यातील स्थानिक लोकांशी भांडणे होणे, टॅक्सी व्यावसायिकांशी वाद होणे अशा घटनाही गोव्यात अधूनमधून घडत आहेत.

गोवा सरकारने किनारी भागात पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. किनाऱ्यांवर फिरून मसाज करणारे, खाद्य पदार्थ विकणारे, खेळणी विकणारे किंवा भीक मागणारे अशा सर्व घटकांविरुद्ध प्रथमच पर्यटन खात्याने कडक भूमिका घेतली आहे. काही जणांना अटकही झालेली आहे. पर्यटकांची दिशाभूल करणाऱ्या दलालांविरुद्धही कारवाई सुरू आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी हा विषय गंभीरपणे घेतला आहे. दलालांना सरळ तुरुंगात टाका, असे आदेश मंत्री खंवटे यांनी पोलिसांना व पर्यटन संचालकांनाही दिले आहेत. यामुळेच सध्या व्यापक पद्धतीने कारवाई होताना दिसत आहे. वर्षभरात हजारभर दलालांना अटक झाली आहे. दलालांच्या छळापासून पर्यटकांची मुक्तता करण्याचा सरकारचा प्रयत्न यातून दिसतोय. तुमको लडकी मिलेगी, असे सांगून आंबटशौकीन पर्यटकांना फसविले जात आहे. युवतींचे बनावट फोटो पर्यटकांना मोबाइलवर दाखवून हजारो रुपये उकळले जात आहेत. फसले गेलेले काही पर्यटक लाजेच्या भयास्तव पोलिसांकडे तक्रार करायला जात नाहीत; पण, अलीकडे दोन-तीन पर्यटकांनी तक्रारीही केल्या आहेत. त्यानंतर कारवाई झाली.

गोव्यात उष्मा वाढला आहे. समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक चुकीच्या ठिकाणी समुद्रात उतरत आहेत. काही ठिकाणी स्नान करण्यास बंदी आहे. तरीही पर्यटक धोका पत्करतात. त्यातील काही पर्यटक तरी बुडून मरण पावत असतात. यामुळे यावेळी किनाऱ्यांवर अधिक जीवरक्षक ठेवले गेले आहेत. पर्यटकांनी जिवाचा गोवा खुशाल करावा; पण काळजी घ्यावी, असा  संदेश आहे.

Web Title: agralekh Goa tourist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा