राज्यात पुन्हा देवेंद्र... बूथप्रमुख’ ते ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ आणि आता ‘पुन्हा मुख्यमंत्री’ असा देवेंद्र यांचा विलक्षण प्रवास राहिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 05:44 IST2024-12-05T05:42:17+5:302024-12-05T05:44:01+5:30
२०१४ ते २०१९ या काळात त्यांनी राज्याला एक सक्षम नेतृत्व दिले, पायाभूत सुविधांपासून सामान्य माणसांशी निगडित अनेक निर्णयांना त्यांनी गती दिली.

राज्यात पुन्हा देवेंद्र... बूथप्रमुख’ ते ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ आणि आता ‘पुन्हा मुख्यमंत्री’ असा देवेंद्र यांचा विलक्षण प्रवास राहिला
मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस... शपथ घेतो की... आझाद मैदानावर गुरुवारी सायंकाळी हा आवाज घुमेल. या आवाजाच्या मागे असेल तो गेल्या पाच वर्षांतील संघर्ष, त्याग आणि मेहनतही. ‘बूथप्रमुख’ ते ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ आणि आता ‘पुन्हा मुख्यमंत्री’ असा देवेंद्र यांचा विलक्षण प्रवास राहिला आहे. वडील दिवंगत गंगाधरराव यांच्या कर्तव्यनिष्ठ आणि पारदर्शी राजकारणाचा वारसा चालवताना त्यांचे सर्वसमावेशक असे नेतृत्व घडत गेले. गेल्या काही वर्षांतील संघर्ष, त्याग आणि त्यातून झालेला संकोच हे सगळे सहन करत फडणवीस पुढे गेले. त्यांचा अभिमन्यू करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला; पण ते चक्रव्यूहातून सहीसलामत बाहेर पडले. परिस्थितीने कठोर परीक्षा घेतली; पण अपार पक्षनिष्ठा, प्रचंड आत्मविश्वास आणि राजकीय डावपेचांमध्ये भल्याभल्यांना चीत करण्याची क्षमता या आधारे ते वाटचाल करीत राहिले. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी राज्याला एक सक्षम नेतृत्व दिले, पायाभूत सुविधांपासून सामान्य माणसांशी निगडित अनेक निर्णयांना त्यांनी गती दिली.
‘जलयुक्त शिवार’ ही अभिनव योजना आणली. भाजपचा यावेळच्या दमदार, शानदार विजयाचे सिंचनही त्यांचेच. त्यांच्या कुशल नेतृत्वातच हा देदीप्यमान विजय मिळाला. भाजपला महायुतीमध्ये १३२ जागा मिळाल्या असताना त्यांच्याकडेच राज्याचे नेतृत्व जाणार हे स्पष्ट झाले होते. आमदारांसह सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांच्या मनातही मुख्यमंत्रिपदासाठी देवाभाऊंचेच नाव होते. ऐनवेळी भलतेच नाव समोर येईल, असा तर्क काहींनी दिला होता. त्यासाठी राजस्थान, मध्य प्रदेशची उदाहरणे दिली जात होती; पण जनभावनेचा आदर राखत भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वानेही असे धक्कातंत्र महाराष्ट्रात न वापरता फडणवीस यांच्याच नावाला पसंती दिली.
कार्यकर्त्यांच्या मनातील धाकधुकीची जागा आता आनंदाने घेतली आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र यांचे बोट धरून त्यांना मुख्यमंत्री केले, यावेळीही ‘देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ हे सूत्र भाजपने स्वीकारले. निकालानंतर सत्तास्थापनेतील विलंबामुळे महायुतीमध्ये आणि विशेषत: भाजप-शिंदेसेनेत काहीसे रुसवेफुगवे असल्याचे चित्र समोर आले. मात्र, आता सत्ताकारणाचे आकाश पुरते मोकळे झाले आहे. फडणवीस यांची भाजपच्या गटनेतेपदी सर्वानुमते झालेली निवड, त्यानंतर राज्यपालांकडे महायुतीने सत्तास्थापनेचा केलेला दावा आणि राज्यपालांनी त्यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करण्याचे सोपस्कारही पूर्ण झाले असून, गुरुवारी फडणवीस हे हजारो लोकांच्या साक्षीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रभावित असलेला आणि त्यांच्या पदचिन्हांवर चालणारा हा नेता महाराष्ट्राची सूत्रे पाच वर्षांसाठी सांभाळणार आहे. राज्याशी संबंधित सामाजिक, आर्थिक, औद्योगिक विषयांचा फडणवीस यांचा गाढा अभ्यास आहे. त्यांच्यातील दूरदृष्टीचा परिचय त्यांनी या आधीच अनेक प्रसंगांमध्ये दिलेला आहे. आता तर त्यांच्या गाठीशी गेल्या काही वर्षांमधील चढउतारांचे चांगले-वाईट अनुभवदेखील आहेत. आपल्यातील नेतृत्वगुणांचा लाभ ते महाराष्ट्राला नक्कीच मिळवून देतील, अशी अपेक्षा आहे.
एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षे ‘जनतेचा मुख्यमंत्री’ अशी स्वत:ची प्रतिमा निश्चितच तयार केली. ‘मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन आहे’, असे ते म्हणत. लाडक्या बहिणीसह अनेक लोकाभिमुख निर्णय त्यांनी घेतले आणि त्यांना लोकप्रियताही मिळाली. सर्वसामान्यांच्या हिताचे धडाकेबाज निर्णय घेणारे मुख्यमंत्री म्हणून जनसामान्यांचे प्रेमही त्यांना मिळाले. आता तेच प्रेम टिकविण्याचे आणि वृद्धिंगत करण्याचे आव्हान फडणवीस यांच्यासमोर असेल. आधी शिंदे-फडणवीस-अजित पवार असा क्रम होता, आता तो फडणवीस-शिंदे-अजित पवार असा असेल एवढाच काय तो फरक. अडीच वर्षांच्या काळात शिंदे यांनी आपल्या दोन सहकारी उपमुख्यमंत्र्यांचा योग्य सन्मान राखत कारभार केला; आता ती जबाबदारी फडणवीस यांची असेल. फडणवीस यांच्या रूपाने एक सुसंस्कृत नेतृत्व महाराष्ट्राला मिळत आहे. सुसंस्कृतपणा आणि संस्कृती या एकमेकांच्या हातात हात घालून चालणाऱ्या बाबी. राज्याच्या राजकीय संस्कृतीचा स्तर गेल्या काही वर्षांमध्ये फारच बिघडला आहे. पातळी सोडून होणारे आरोप, बडबोल्या नेत्यांची गर्दी, एकमेकांचे चारित्र्यहनन, किळसवाणी भाषा महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेला साजेशी नव्हतीच. एकूणच राजकीय गढूळपणा इतका वाढलेला असताना फडणवीस यांनी सुसंस्कृतपणाची तुरटी त्यात फिरवावी, त्यासाठी विरोधकांनाही विश्वासात घ्यावे, अशी अपेक्षा आहे.