Maharashtra Day 2020: वय वाढले तशी समज घटली!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 03:03 AM2020-05-01T03:03:56+5:302020-05-01T03:04:20+5:30

तर पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त करण्यासाठी जो लढा झाला, त्यातही महाराष्ट्रातील नेतेमंडळी सहभागी होती. महाराष्ट्राचा इतिहास हा लढाऊ आहे.

Age increased, perception decreased! | Maharashtra Day 2020: वय वाढले तशी समज घटली!

Maharashtra Day 2020: वय वाढले तशी समज घटली!

Next

- बबनराव ढाकणे
मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र असावा म्हणून जो लढा झाला, त्यातून आजच्या महाराष्ट्राची निर्मिती झाली. या लढ्यात मीदेखील एक सैनिक होतो, याचा अभिमान आहे. संयुक्त महाराष्ट्रच नाही, तर पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त करण्यासाठी जो लढा झाला, त्यातही महाराष्ट्रातील नेतेमंडळी सहभागी होती. महाराष्ट्राचा इतिहास हा लढाऊ आहे. चळवळीचा आहे. विचारांचा आहे.
गत साठ वर्षांत सामाजिक पातळीवर आपले राज्य प्रचंड मागे गेले, असे आपणाला सातत्याने दिसले आहे. महाराष्टÑ हा विवेकी होता. दुर्बलांना संधी द्या, त्यांना कमी लेखू नका, ही शिकवण आपल्या राज्याने दिली. आपल्या संतांनीदेखील अंधश्रद्धा कधीही मानली नाही. नवसाने पोरेबाळे होत नाहीत, अशी आपल्या संतांची भाषाही वैज्ञानिक होती. फुले, शाहू, आंबेडकरांची ही भूमी आहे. देशाला आरक्षणाचे धोरण शाहू महाराजांनी शिकविले. सवर्ण-दलित ही दरी व अस्पृश्यता महाराष्टÑातून समूळ नष्ट व्हायला हवी होती; पण तसे झाले नाही. या पुरोगामी राज्यात जाती अधिक घट्ट झाल्या असे दिसत आहे. जातीच्या आधारे येथे हत्याकांडे झाली. राजकारण्यांनी स्वार्थासाठी हा जातीवाद पोसला आहे. पूर्वी राजकीय पक्ष राजकारण करताना उमेदवारांची जात पाहत नव्हते. पैशावर मते मागत नव्हते. आता पैसा व जात हे राजकाणात सर्वोच्च स्थानी आहेत. कुठलाही पक्ष त्यास अपवाद नाही. सत्ताधारीही निर्मळ नाहीत व विरोधकही. जे लोक समाजासाठी काम करत आहेत, चळवळी करत आहेत, ज्यांच्याकडे काही वैचारिक नीतिमत्ता आहे, असेच लोक पूर्वी जनतेतून निवडून जात होते. आता काय परिस्थिती आहे? मी जेव्हा राजकारणात सक्रिय होतो, तेव्हा गावात सरपंच व्हायला कुणी तयार नसायचे. कारण हे जबाबदारीचे पद आहे याची जाणीव होती. समाजासाठी काम करणारी प्रामाणिक व्यक्तीच या पदावर बसली पाहिजे, अशी भावना त्यात होती. आता जो दहा-वीस लाख खर्च करेल तो सरपंच होतो. नगरसेवक होतो. राजकारणात पैसा व जात महत्त्वाची बनली आहे. प्रत्येक नेत्याला सर्व पदे आपल्या स्वत:कडे व कुुटुंबातच हवीत, असे वाटू लागले आहे. सुसंस्कृत व पुढारलेला महाराष्टÑ असे कसे वागू शकतो?


संयुक्त महाराष्टÑ आंदोलनात विविध पक्ष, संघटना, लेखक, कवी एकत्र आले होते. शाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे, गव्हाणकर, आचार्य अत्रे यांनी कुणाचीही भीडभाड न ठेवता लिहिले. लढ्यात भागीदारी दिली. आता लेखक, कवी कोठे आहेत? साहित्य संमेलनातील ठराव तरी आपण निर्भीड बाणा दाखवत करतो आहोत का? हा भेकडपणा महाराष्टÑात कोठून आला? व कुणी आणला? गत साठ वर्षांत आपण आपली वैचारिक बैठक गमावली आहे. नीतिमूल्यांच्या पातळीवर आपण प्रचंड मागे गेलो आहोत. वय वाढेल तशी समज वाढायला हवी. मात्र महाराष्टÑाची समज घटली असे आपले मत आहे.
वसंतराव नाईक महसूलमंत्री असताना अन्नटंचाई होती. त्या वेळी बाहेरच्या देशातून अन्नधान्य आणावे लागले. आपण अगदी सत्तरच्या सालापर्यंत ही टंचाई दूर करू शकलो नाहीत; यामुळे नाईक अस्वस्थ होते. ‘अन्नटंचाई दूर करू शकलो नाही तर मी फाशी घेईन,’ असे ते म्हणाले होते. पुढे अन्नटंचाई हटविण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. स्वत: शेतात गेले. आता कोणता मंत्री अशी निष्ठा दाखवितो आहे? ३३ कोटी झाडे लावण्याची घोषणा आपल्या सरकारने केली होती. दाखवू शकतो का आपण ही झाडे?

आम्ही फारसे शिकलेलो नव्हतो. आठवी पास असून मी केंद्रात व राज्यात मंत्री झालो. सातवी शिकलेले वसंतदादा मुख्यमंत्री झाले. राजकारण व समाजकारण कसे करायचे, हे आम्हाला लोकांनी शिकविले. कारण, आम्ही सतत लोकांमध्ये होतो. जनतेचाही एक नैतिक धाक आमच्यावर होता. आज हा धाकही कमी झाला आहे. राजकारणी कसेही वागले, तरी जनतेलाही काहीच वाटेनासे झाले आहे. असेच सुरू राहिले तर आपले अधिक वैचारिक अध:पतन होत जाईल. महाराष्ट्र निर्मितीचा हीरकमहोत्सव आपण साजरा करीत आहोत. मात्र, आजही बेळगाव आणि निपाणी आपल्यात नाही. तेथील मराठी भाषिक आपणाकडे आशेने पाहताहेत. पिढ्यान्पिढ्या सीमा भागातील हे लोक महाराष्टÑात येण्यासाठी लढत आहेत; परंतु हा प्रश्न निकाली काढला जात नाही.
(माजी केंद्रीय मंत्री)

Web Title: Age increased, perception decreased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.