अभिमन्यू, अर्जुन, रणछोड आणि रणांगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 04:55 PM2019-10-17T16:55:26+5:302019-10-17T16:56:06+5:30

मिलिंद कुलकर्णी महाराष्टÑातील विधानसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. रामायण आणि महाभारत या महान ग्रंथामधील अनेक पात्रे प्रत्यक्षात ...

Abhimanyu, Arjun, Ranchod and Battlefield | अभिमन्यू, अर्जुन, रणछोड आणि रणांगण

अभिमन्यू, अर्जुन, रणछोड आणि रणांगण

Next

मिलिंद कुलकर्णी
महाराष्टÑातील विधानसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. रामायण आणि महाभारत या महान ग्रंथामधील अनेक पात्रे प्रत्यक्षात अवतरल्याचा भास मतदारांना पदोपदी जाणवत आहे. कधी स्वत: उमेदवार स्वत:ला ही पात्रे असल्याचे भासवतो तर कधी मतदार त्याला त्या पात्राच्या भूमिकेत असल्याचे बघतात. निवडणुकीच्या रणांगणातून काहींनी पलायन करताना तात्विक कारणे दिली आहेत, तर काहींनी वैयक्तिक अडचणी मांडल्या आहेत. एकंदर रणांगणावर महायुध्द रंगात आले आहे.
मुक्ताईनगर हा मतदारसंघ भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा गड आहे. परंतु, गेल्या साडेतीन वर्षांपासून पक्षांतर्गत विरोधकांमुळे खडसे अडचणीत आले आहेत. मंत्रिपद गेले. चौकशीचा ससेमिरा लागला. निष्पन्न काही झालेले नसतानाही खडसे यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले नाहीच, शिवाय त्यांना यंदा विधानसभेची उमेदवारी सुध्दा नाकारण्यात आली. भुसावळच्या सभेत काल खडसे यांनी अनेक बाबी उघड केल्या. सहावेळा आमदार राहून चुकलेल्या खडसे यांना एकदा पुन्हा संधी मिळण्याची अपेक्षा गैर म्हणता येणार नाही. कन्या रोहिणीला उमेदवारी मिळाली हे त्यातल्या त्यात समाधान म्हणावे लागेल. तरीही खडसे यांच्या मनातील शल्य कायम आहे. पक्षाने उमेदवारी का नाकारली, माझा काय गुन्हा हे मी पक्षाला निश्चित विचारणार आहे, हे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. राष्टÑवादीने दिलेले तिकीट व विरोधी पक्षनेतेपदाच्या आॅफरविषयी गौप्यस्फोट करताना खडसे म्हणाले, ४२ वर्षे ज्या पक्षाला वाढविले, विस्तार केला आणि पक्षाने देखील सहा वेळा आमदार, विधिमंडळात गटनेते, विरोधी पक्षनेते, १२ खात्यांचे मंत्रिपद असा मानसन्मान दिला असताना आता पक्ष सोडण्याचा विचार मनात येणार नाही. पक्षांतर्गत विरोधकांनी ‘अभिमन्यू’ करण्याचा प्रयत्न केला, पण मी अर्जुन आहे हे लक्षात घ्या. सगळ्यांना मी पुरुन उरेल. एवढी संकटे, आपत्ती झेलूनदेखील खडसे ज्या तडफेने पुन्हा सामना करण्याला सज्ज होतात, हे त्यांचे सर्वात मोठे गुणवैशिष्टय म्हणावे लागेल.
शिवसेनेची मुलुख मैदान तोफ म्हणून ज्यांची राज्यभर ओळख आहे, असे सहकार राज्यमंत्री, सेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांची आप्तस्वकीय आणि प्रतिस्पर्र्धींनी कोंडी केली आहे. या कोंडीचा विस्फोट पंतप्रधानांच्या सभास्थळी झाला. भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांचे सख्य आहे. परंतु, तरीही गुलाबरावांचा संताप बरेच काही सांगून जाणारा आहे. मुळात जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबरावांना घेरणारी मंडळी पूर्वीचे त्यांचेच सहकारी होते. पी.सी.पाटील, चंद्रशेखर अत्तरदे हे खडसे गटाचे ओळखले जातात. खडसे-गुलाबराव यांच्यातील वितुष्ट जगजाहीर आहे. असे वेगवेगळे कंगोरे या बंडखोरीमागे आहे. एक मात्र खरे मंत्रिपद मिळाल्यानंतर केवळ जनतेच्या नव्हे तर आप्तस्वकीयांच्या अपेक्षा वाढतात आणि सगळ्यांचे समाधान करता येत नसल्याने नाराजांचे प्रमाण वाढते.हा अनुभव सध्या गुलाबराव पाटील घेत आहेत.
चोपड्यात सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचीही चहुबाजूने कोंडी झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घरकूल प्रकरणाचा निकाल लागला आणि सोनवणे यांना कारागृहात जावे लागले. गेल्यावेळी सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर यांना त्यांच्या पक्षाने साथ दिली होती, तशीच यावेळी सोनवणे यांनाही दिली. पत्नी लता सोनवणे यांना सेनेची उमेदवारी मिळाली. परंतु, भाजपचे जि.प.सभापती प्रभाकर सोनवणे यांनी बंडखोरी केली. त्यांच्यासोबत युतीधर्माला हरताळ फासत भाजपचे पदाधिकारी जाणे हे एकवेळ समजू शकते. परंतु, सेनेचे माजी आमदार कैलास पाटील व महिला आघाडीच्या माजी जिल्हाप्रमुख इंदिराताई पाटील हे उघडपणे बंडखोर उमेदवारासोबत फिरत आहे. सेनेने हकालपट्टीची कारवाई केली, त्याचा कितपत लाभ आता लता सोनवणे यांना मिळतो, हे बघायचे.
एकेका मतदारसंघात अनेक इच्छुक असताना एकालाच उमेदवारी मिळाली. बाकी इच्छुक पक्षश्रेष्ठींनी दिलेले आश्वासनानुसार ‘रणछोड’ बनले. खान्देशात दखलपात्र असे १६ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी किमान दोन-तीन अंतिम टप्प्यापर्यंत टिकून राहिले आहेत. आता कोण अभिमन्यू होतो, कोण अर्जुन ठरतो हे २४ ला कळेल.

 

Web Title: Abhimanyu, Arjun, Ranchod and Battlefield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.