शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

अखंड हिरव्या बोलीचं ‘महानोर’ नावाचं झाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 10:43 IST

महानोरांची कविता जगण्यातून आली. ती रानातली कविता आहे! लोकपरंपरा आणि आधुनिकतेच्या बांधावर उभे राहून त्यांनी कवितेची मशागत केली!

शंभू पाटील, ख्यातनाम लेखक, रंगकर्मी -

कवीचं काही वय असतं का ? कवी कधी म्हातारा होतो का ?कवी कधी मरतो का ?  कवीचं शरीर थकतं, तो काळाचा महिमा; पण कवी शाश्वत असतो. कविता नावाची अद्भुत गोष्ट काळाला पुरून उरते, कवी कायमचा मनात कोरलेला असतो. मनावर कोरलेले काहीच कवी असतात, अशा मराठी कवींमध्ये महानोर दादा आहेत. ब्याऐंशीव्या वर्षी दादा गेले, म्हणजे दादांचं शरीर गेलं; त्यांची कविता मात्र अजरामर आहे.

दादांची कविता राज्यकर्त्यांना मोहात पाडते, कवितेचे अभ्यासक चकित होऊन या कवितेबद्दल बोलत राहतात, समीक्षक यातील शब्दकळा बघून अवाक होतात, विद्यापीठात यावर चर्चासत्र सुरू असतं तेव्हा कुठे तरी शेतात पाणी भरणारा शेतमजूर ही कविता म्हणत असतो, बांधावर बसून राखण करणारा पोरगा ही कविता गात असतो, एखादी बाई घरकाम करता करता त्यांचे शब्द गुणगुणत असते... किती कवींच्या वाट्याला हे भाग्य येतं ? मानवाला विस्मरणाचा शाप आहे; पण महानोरांच्या कविता मनातून जात नाहीत त्या नाहीतच!

पळसखेड अगदी छोटंसं गाव. या गावाच्या बाहेर असलेल्या शेतातल्या कुडाच्या झोपडीत मराठीत शतकानुशतके पुरून उरेल अशी कविता लिहिणारा हा शेतकरी. ज्याचं नातं तुकारामाशी अगदी घट्ट बांधल गेलं होतं. जात्यावर ओव्या म्हणणाऱ्या आईने कवितेची ओळख करून दिली; आयुष्यभर हा कवी त्या कवितेचा पदर पकडून प्रार्थना करत राहिला!

या नभाने या भुईला दान द्यावे या मातीतुनी चैतन्य गावे...कवीची कविता जगण्यातून आली तर ती श्रेष्ठ कविता असते. महानोरांची कविता अशीच जगण्यातून आली, म्हणून ती रानातली कविता आहे. चांगल्या गीतकाराला एरवी कधी कवी समजलं जात नाही, चांगला कवी गीतकार असतोच असंही नाही; पण अजरामर गाणी लिहिणारे महानोर तितकेच थोर कवी होते; हे किती दुर्मीळ आहे! आपल्या लोकपरंपरा पूर्ण रीचवत त्यांना आधुनिक कवितेचा  आयाम देणारा हा कवी लोकपरंपरा आणि आधुनिक कविता यांच्या बांधावर कवितेची मशागत करत होता!  

सूर्यनारायणा नित नेमाने उगवाअंधाराच्या ठायी थोडा उजेड पाठवामराठी साहित्यात हा उजेड अनेकांच्या जीवनात प्रकाश घेऊन आला. आडवळणाच्या  खेड्यातील या कवीसाठी मुख्यमंत्री  यशवंतराव चव्हाण, कुसुमाग्रज, लताबाई, पुलं आणि शरद पवारांपासून कित्येक मान्यवर  रस्ता नसलेल्या त्यांच्या गावात जात राहिले! किती किती जणांनी महानोरांवर, त्यांच्या कवितांवर लोभ केला! प्रतिभावंत लेखक, संगीतकार, गायक असोत, की शरद पवारांसारखे राजकीय नेते आणि भवरलाल जैन यांच्यासारखे रसिकाग्रणी उद्योगपती असोत, की त्यांच्या कविता-गाण्यांवर जीव ओवाळणारी सामान्य माणसं; महानोरांना भरभरून स्नेह लाभला! 

...हे सगळं असताना दुःखाची वर्तुळंही कायम या माणसाभोवती गरगरत राहिली!जन्माचेच दुःख, जन्मभर असोमला न काही, त्याचे फारसेअसं म्हणत दुःखावर मात करत, शेतीत सतत नवनवे प्रयोग करत आयुष्यभर शेती करत राहणारा हा शेतकरी  शेतकऱ्यांना कायम प्रेरणा देत राहिला. पाणलोट क्षेत्र, फळबागांसाठीचं धोरण;  शेती समृद्ध करण्यासाठी या माणसाने आपली आमदारकी वापरली. दोन वेळा आमदार असून महानोर यांची कोणतीही संस्था नाही की मुंबईतच काय; पण जळगावमध्येदेखील त्यांचा स्वतःचा फ्लॅट नाही.  जे केलं ते शेतीसाठी केलं, जे मिळवलं ते शेतीमधून मिळवलं. 

कष्टाला कल्पकतेची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली की शेती पोट भरून देते, असं ते वारंवार सांगायचे. शेतकरी आत्महत्या हा शेवटपर्यंत त्यांना अस्वस्थ करणारा विषय होता. आत्महत्या हा आपला मार्ग नाही असं प्रत्यक्ष कृतीतून पटवून देत दादा शेवटपर्यंत शेतीत प्रयोग करत राहिले. 

त्यांचा सांभाळ करणारी मुलं, मुली आणि लाडका नातू शशी; हे सगळे आहेत; पण सुलोचना काकूंनी दादांची साथ अर्ध्यातच सोडली. दोन वर्षांपूर्वी त्या गेल्या आणि कोणत्याही दुःखाने न हललेला हा कवी अंतर्बाह्य हादरला! अनेक व्याधी व आजार यांच्यासोबतचा दादांचा लढा सुरू होता. 

निष्पर्ण झालेल्या सीताफळाला पावसाच्या पहिल्या थेंबाने पालवी फुटते, गर्द हिरवा रंग धारण करून हे झाड फळांनी लदबदून जातं,  तसंच आम्हाला सावली देणारं  महानोर नावाचं झाड पुन्हा बहरून येईल असं वाटलं होतं; पण हिरव्या बोलीचा शब्द झालेले दादा आज सर्वत्र हिरवळ असताना तिला अबोल करून निघून गेले आहेत!

टॅग्स :literatureसाहित्यMarathi Songsमराठी गाणीMaharashtraमहाराष्ट्र