नवरीच्या घरावर विमानातून नोटांची बरसात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 10:26 IST2025-01-02T10:25:50+5:302025-01-02T10:26:44+5:30

जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे तर कितीदातरी त्यांचे हात पसरून झाले; पण काही दिवस झाले की लगेच यांचं सुरू, अजून मदत करा!..  

A plane rains down banknotes on the bride's house! | नवरीच्या घरावर विमानातून नोटांची बरसात!

नवरीच्या घरावर विमानातून नोटांची बरसात!

पाकिस्तानची आर्थिक स्थिती सगळ्यांनाच माहीत आहे. पाकिस्तानचे अक्षरश: खाण्यापिण्याचेही वांधे झाले आहेत. त्यामुळेच कटोरा घेऊन त्यांना रोज दारोदारी फिरावं लागतं आहे. जिथून कुठून मदत मिळण्याची शक्यता असेल, त्या त्या ठिकाणी हे आधीच हजर! जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे तर कितीदातरी त्यांचे हात पसरून झाले; पण काही दिवस झाले की लगेच यांचं सुरू, अजून मदत करा!..  

असं असलं तरी पाकिस्तानची गुर्मी जात नाही ती नाहीच. विशेषत: भारताच्या बाबतीत. भारताचं नाव निघालं की ते लगेच गुरगुरायला लागतात. अर्थात त्यानं काही फरक पडत नाहीच. उलट भारताचं नाव घेतलं की अलीकडे पाकिस्तानी नागरिकच आपल्या सरकारला खडे बोल सुनावताना सांगतात, पाकिस्तानात खुट्ट जरी झालं तरी तुम्ही भारताचं नाव कसं काय घेता म्हणून? भारताची बरोबरी आपल्याला कधीच करता येणार नाही, भारत कुठे, आपण कुठे..! त्यामुळे भारताला पाण्यात पाहण्यापेक्षा आपणच आपली आर्थिक स्थिती सुधारण्याच्या मागे लागलं पाहिजे हे बरं.. 

पाकिस्तान कंगाल आहे, हे एकदम खरं; पण सगळेच पाकिस्तानी कटोरा घेऊन फिरताहेत का? - तर तसंही नाही. जसं प्रत्येक देशात असतं, तसंच पाकिस्तानातल्याही काही गिन्याचुन्या लोकांकडे दडपून संपत्ती आहे. बहुतेक पाकिस्तान्यांकडे खायलाही काही नाही, तर काहीजण नोटांची अक्षरश: उधळण करतात..

असाच एक किस्सा पाकिस्तानात सध्या प्रचंड गाजतो आहे. सोशल मीडियावर तर त्यासंबंधीचा व्हिडीओ रोज नवनवे विक्रम करतो आहे. काय आहे हा किस्सा?

पाकिस्तानात नुकतंच एक लग्न झालं. लग्न म्हटलं की सगळीकडे साधारण सारखंच. धामधूम. छानछोकी. दिखाऊगिरी. आपली ऐपत असो किंवा नसो, अनेकजण लग्नात वारेमाप पैसा खर्च करतात. बऱ्याचदा ‘घरातलं पहिलंच लग्न आहे, शेवटचंच लग्न आहे, एकच तर मुलगा/मुलगी आहे..’ मग ते धूमधडाक्यातच झालं पाहिजे, काय लग्न केलं म्हणून सगळ्यांनी तोंडात बोटं घातली पाहिजेत.. असा बहुतेकांचा अट्टाहास असतो. त्यामुळे लग्नात काही म्हणता काही कसूर ठेवली जात नाही. थोरामोठ्यांच्या लग्नात तर पैसा अक्षरश: पाण्यासारखा वाहत असतो..

आता पाकिस्तानातल्या या लग्नाचंच पाहा.. या लग्नात दोन्ही पार्टी तशा तालेवार. पैशांची काही कमतरताच नाही.. पण या लग्नात पैसा वाऱ्यासारखा उडवताना नवरदेवाच्या बापानं काय करावं? त्यानं एक विमानच भाड्यानं घेतलं. या विमानातून त्यानं नवरीच्या घरावर पैशांची अक्षरश: बरसात केली. अक्षरश: लाखो रुपये उधळले. 

हे विमान आधीच अतिशय खालून उडत होतं. इतक्या जवळून विमान उडत असल्यानं त्याच्या आवाजानं साहजिकच सगळ्यांच्या माना वर गेल्या. जो तो औत्सुक्यानं या विमानाकडे पाहत होता. नवरीचं घर जवळ येताच विमानातून कागदांचे गठ्ठे भिरकावले गेले. वाऱ्यावर उडत उडत हे कागद खाली उभ्या असलेल्या लोकांच्या जवळ, त्यांच्या अंगाखांद्यावर पडले, त्यावेळी त्यांना कळलं, हे कागद नाही तर ‘असली’ नोटा आहेत! वाऱ्यावर उडणाऱ्या या नोटा गोळा करण्यासाठी लोकांची मग अक्षरश: झुंबड उडाली आणि चेंगराचेंगरीही झाली. आपण किती श्रीमंत आहोत हे दाखवण्यासाठी, ‘मोठायकी’ करण्यासाठी वरपित्यानं अक्षरश: लाखो रुपये उधळले!

हे काय होतं आहे आणि विमानातून, आकाशातून पैसे का पडताहेत, हे लोकांना काही कळेना. पण त्याचा विचार न करता आधी लोकांनी जेवढ्या नोटा आपल्याला गोळा करता येतील, तेवढ्या नोटा गोळा केल्या. आता कुठेही एकही नोट पडलेली नाही, याची खात्री केल्यानंतर काहींनी तपास सुरू केला, त्यावेळी कळलं की आपल्या मुलाच्या लग्नानिमित्त वरपित्यानं केलेली ही दौलतजादा होती! या व्हिडीओने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला. हा व्हिडीओ पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हैदराबाद येथील आहे, असं आधी म्हटलं जात होतं. पण ‘तपासानंतर’ कळलं, की पाकिस्तानमधील पंजाबच्या मंडी बहाउद्दीन इथला हा व्हिडीओ आहे. आपली किती ‘शान’ आहे हे दाखवण्यासाठी, नवरीकडच्या लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी नवरदेवाच्या वडिलांनी लाखो रुपये हवेत उधळले होते. या प्रकारावर टीका होत असली तरी, ज्यांना या नोटा मिळाल्या त्यांनी मात्र नवरदेवाच्या वडिलांना ‘दुआ’ दिली आहे!

दुल्हेराजा जिंदगीभर भुगतेगा!..
पाकिस्तानात या प्रकारावरून सोशल मीडियावर रान उठलं आहे. दोन्ही बाजूंनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काही यूझर्सनी म्हटलं आहे, असा वायफळ खर्च काय कामाचा? पैसे उधळून नवरदेवाच्या वडिलांनी पैशांचा, संपत्तीचा अपमान केला आहे. काही यूझर्सचं म्हणणं आहे, बापानं कर्ज काढून उडवलेल्या या पैशाची ‘दुल्हेराजा’ला आयुष्यभर परतफेड करावी लागेल!

 

 

Web Title: A plane rains down banknotes on the bride's house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.