क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 07:35 IST2025-12-16T07:32:19+5:302025-12-16T07:35:16+5:30
लिओनेल मेस्सीची जादू भारत दौऱ्यात पाहायला मिळाली. त्याच्यासोबतच्या केवळ एका फोटोसाठी आणि हस्तांदोलनासाठी अनेकांनी अक्षरश: लाखो रुपये मोजले!

क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
रोहित नाईक
उपमुख्य उपसंपादक,
लोकमत, मुंबई
अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आधुनिक फुटबॉलचा 'पेले' अशी ओळख आहे. त्याची क्रेझ केवळ अर्जेंटिनाच नाही, तर संपूर्ण जगामध्ये आहे. मेस्सीसाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या फुटबॉलवेड्यांची कमतरता आपल्याकडेही नाही. मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी तुफान चढाओढ गेल्या काही दिवसांपासून भारतीयांनी अनुभवली.
साधारण, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मेस्सीचा 'गोट (जी.ओ.ए.टी.) इंडिया टूर २०२५' हा दौरा जाहीर झाला. तेव्हापासून भारतीय फुटबॉलचाहते मेस्सीला प्रत्यक्षात पाहण्याची स्वप्ने पाहू लागली. मेस्सीची ही जादूच आहे. आपल्या पायाच्या जोरावर त्याने जगभरात कमावलेले हे प्रेम आहे. १९७७ साली फुटबॉल सम्राट पेले यांनीही भारतात कोलकाताला भेट दिली होती आणि मोहन बागान क्लबविरुद्ध एक प्रदर्शनीय सामनाही खेळला होता. तेव्हाही
फुटबॉलवेड्यांची अशीच गर्दी इडन गार्डनवर जमली होती. पण, मेस्सीची ही भेट वेगळी ठरली. यावेळी, तो कोणताही सामना खेळण्यासाठी आला नव्हता, तर भारतातील आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी आला होता. मेस्सीचा हा भारत दौरा भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी एक प्रतीकात्मक आणि दूरगामी परिणाम करणारा क्षण ठरला. जागतिक फुटबॉलचा चेहरा मानल्या जाणाऱ्या मेस्सीचे भारतात आगमन झाले, तेव्हा क्रिकेटवेड्या देशात फुटबॉलची प्रचंड चर्चा रंगली.
मेस्सीच्या भारत दौऱ्यातील कोलकाता टप्प्यात मोठा गोंधळ उडाला. ज्या मेस्सीला पाहण्यासाठी हजारो रुपयांचे तिकीट काढले, त्याची केवळ ओझरती झलक आणि तीही काही क्षणांची ठरल्याने चाहते संतापले आणि त्यांना सॉल्ट लेक स्टेडियमची नासधूस केली. यानंतर, हैदराबाद टप्यात मेस्सीचा कार्यक्रम सुपरहीट ठरल्यानंतर मुंबईमध्ये तर मेस्सी तेंडुलकर अशा दोन दिग्गजांच्या जुगलबंदीने वेगळीच रंगत आली. शिवाय, मुंबईतील कार्यक्रमात भारतीय फुटबॉलचा चेहरा असलेल्या सुनील छेत्रीचीही उपस्थिती राहिल्याने भारतीय क्रीडाप्रेमींसाठी तो दुग्धशर्करा योग ठरला. हा तोच छेत्री आहे, ज्याला भारतीय संघाचे सामने पाहण्यासाठी आणि आपल्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याकरता हात जोडून विनवणी करावी लागली होती. मात्र, अर्जेटिनाच्या मेस्सीला केवळ पाहण्यासाठी हे फुटबॉलप्रेमी हजारो रुपयांचे तिकीट खरेदी करून कोलकाता, हैदाराबाद, मुंबई आणि दिल्लीतील स्टेडियमवर उपस्थित राहिले होते.
मुंबईत मेस्सी आणि सचिन तेंडुलकर यांची झालेली भेट क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच ठरली. जे वानखेडे स्टेडियम 'सचिन.. सचिन..' अशा जयघोषाने दुमदुमले जायचे, तेच स्टेडियम रविवारी 'वुई लव्ह मेस्सी... वुई लव्ह मेस्सी.' अशा जयघोषाने दणाणून गेले. सचिन आणि मेस्सी या दोघांच्याही जर्सीचा क्रमांक दहा आणि या क्रमांकाची जादूही यावेळी दिसून आली. मेस्सीने आपल्या अर्जेंटिना संघाची जर्सी सचिनला भेट दिली आणि सचिनने २०११
विश्वविजेत्या भारतीय संघाची आपली जर्सी मेस्सीला भेट दिली. अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार राहिलेल्या वानखेडे स्टेडियमने १० क्रमांकाची ही अनोखी जादू अनुभवली.
भारत हा जागतिक फुटबॉलमधील झोपलेला सिंह आहे, असे म्हटले जाते आणि या सिंहाची आर्थिक ताकद मेस्सीच्या या दौऱ्यादरम्यान दिसून आली. मेस्सीसोबत एक फोटो घेण्यासाठी अनेकांनी १० लाख रुपये मोजले, तर दिल्लीत त्याच्याशी केवल हस्तांदोलन करण्यासाठी जवळपास एक कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. हाच पैसा जर भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी खर्च झाला, तर भारत फुटबॉलच्या जागतिक नकाशावर ठळकपणे दिसू शकेल. आपल्याला फुटबॉल प्रेक्षक बनायचे आहे की फुटबॉलपटू, हे कळेल, तेव्हा नक्कीच भारतात फुटबॉल क्रांती घडेल. भारत केवळ क्रिकेटची बाजारपेठ नसून, फुटबॉलसाठीही मोठी क्षमता असलेला देश आहे, हे यातून स्पष्ट झाले.
मेस्सीच्या दौऱ्यामुळे भारतीय फुटबॉलच्या पायाभूत विकासाकडेही लक्ष वेधले गेले. मेस्सीची उपस्थिती युवा खेळाडूंसाठी स्वप्नपूर्तीची जाणीव देणारी ठरली. तथापि, या दौऱ्याचे यश दीर्घकालीन परिणामांमध्ये रूपांतरित करण्याचे आता मुख्य आव्हान आहे.