१२ धडे आणि ३६५ कोऱ्या पानांचं पुस्तक उद्या मिळणार... पुढे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 09:48 IST2024-12-31T09:47:15+5:302024-12-31T09:48:06+5:30

जगण्याचं ‘इम्प्रोव्हायझेशन’ म्हणजे ‘चांगले बदल घडवून आणणे’ ही क्रिया सतत व्हायला हवी! त्यासाठी ३१ डिसेंबरसारख्या तारखा आपल्याला मदत करतात.

A book with 12 lessons and 365 blank pages will be available tomorrow but what is Next? | १२ धडे आणि ३६५ कोऱ्या पानांचं पुस्तक उद्या मिळणार... पुढे?

१२ धडे आणि ३६५ कोऱ्या पानांचं पुस्तक उद्या मिळणार... पुढे?

सोनाली लोहार, व्हॉइस थेरपिस्ट -

डिसेंबर महिना तसाही कौतुकाचाच, म्हणजे अगदीच रंगीबेरंगी. त्यात भर म्हणजे  धुक्यात भिजवून उगवलेली सकाळ! सध्या त्याला धुकं म्हणायचं की, धुरकं यावर गोंधळ सुरू आहे ही बाब सोडा; पण एकंदरीत सरत्या वर्षाचं वातावरण नक्कीच आल्हाददायक आहे.

तसं म्हणायला गेलं तर हा सगळा कॅलेंडरवरच्या आकड्यांचा खेळ, म्हणजे २०२४ संपलं आणि २०२५ उजाडलं वगैरे. खरं तर पृथ्वी तशीच गोल फिरतेय. रात्र तशीच संपतेय आणि सूर्यही तसाच वर येतोय; पण तरीही ३१ डिसेंबर ही तारीख जवळ यायला लागली, की नकळत मनात आकडेमोड सुरू होते. काहीतरी हातातून सुटतंय आणि त्यावर आपला काहीच ताबा नाही अशी काहीतरी अनाकलनीय हुरहूर लागते. सत्य हेच आहे की, सरकणाऱ्या काळावर आपलं स्वामित्व नाही, तो पुढे जाणारच आणि जाताना त्याच्या खुणा उठवत जाणार. शरीरावर, मनावर आणि सभोवतालावरही!

पुढच्या क्षणी काय होणार हे मला माहिती आहे, या भ्रमात माणसाने कधीही राहू नये, हे खरंच. अर्थात याचं आकलन व्हायलाही वयाची काही ठराविक वर्षे जातातच; पण जगण्याचं ‘इम्प्रोव्हायझेशन’ म्हणजे ‘चांगले बदल घडवून आणणे’ ही क्रिया मात्र होतच राहायला हवी आणि त्यासाठी ३१ डिसेंबरसारख्या या तारखा नक्कीच मदत करतात. जो क्षण पदरात आहे तो सर्वार्थाने जगला पाहिजे... त्या एका क्षणात मी काहीतरी छान वाचेन, काही छानसं ऐकेन, काही छान बोलेन, काही छान चव घेईन, एखादं छानसं फूल केसात माळेन, झाडाच्या गर्द सावलीत निवांत पडेन, अंगणात नाहीतर गच्चीत चादर अंथरुण एखाद्या रात्री चांदण्यांशी बोलेन, अगदीच काही नाही जमलं तर समोरच्याला एक छानसं स्माईल तरी देईनच; पण त्या प्रत्येक क्षणात मी असेन, मी जगेन!

भूतकाळात तरी माणसाने किती दिवस जगायचं आणि भविष्य तर माहीतच नसतं, मग मनातली ही हजारो किल्मिषं आणि वेदना घेऊन कुठे जाणार आहोत आपण! यावर मार्ग एकच की, डोक्यातली सगळी ओझी आणि जळमटं एक मोठा श्वास घेऊन उतरवून टाकायची, मग पुढचा प्रवास सोपा होऊन जातो. इतकं करूनही आयुष्य म्हणजे शर्यत समजूनच धावत राहिलो तर त्या प्रवासात जागोजागी लागलेली सुंदर ठिकाणं मात्र बघायचीच राहून जातील. एका मोठ्या अभिनेत्याची अत्यंत प्रामाणिक मुलाखत नुकतीच ऐकली. तीस वर्ष कामाच्या ‘नशे’त धावता धावता  स्वतःच्या मुलांचं बालपण, तारुण्य, हातातला पत्नीचा हात हे सगळच सुटून गेलं. यश, कीर्ती पैसा मिळाला; पण जे गमावलं त्याची किंमतच होऊ शकत नाही, ही खंत त्यांनी बोलून दाखवली.

हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. म्हणून उशीर होण्याआधीच आपल्या प्राथमिकता या भावनांच्या आणि जगण्याच्या गुणवत्तेच्या निकषावर तपासून बघायला हव्यात.

आयुष्य यशापयशाच्या खाचखळग्यांतूनच जाणार आणि आशा-निराशेच्या हिंदोळ्यावरही झुलत राहणार, हे अगदीच मान्य; पण आपल्याला स्वतःच्या आयुष्याकडे त्रयस्थ नजरेनेही बघता यायला हवं. स्वतःचंच मूल्यमापन करता आलं की,  भरकटणं थांबतं.

येणारं वर्ष हे १२ धड्यांचं एक पुस्तक समजलं तर आपल्याला आपली कथा लिहिण्यासाठी नियतीने ३६५ कोरी पानं उपलब्ध करून दिली आहेत. या पानांवर काय लिहायचं हे आपण ठरवायचं. येणारी प्रत्येक सकाळ ही सकारात्मक विचारांनी आणि रात्र ही कृतज्ञतेनेच संपवूया. ‘आपण श्वास घेतोय’ हीसुद्धा किती मोठी देणगी आहे! ‘माझ्याकडे काय नाही’ या विचारापेक्षा ‘माझ्याकडे किती सारं आहे’ हा विचार मोठा नाही का? ‘समाज माझ्यासाठी काही करत नाही’ यापेक्षा ‘मी समाजासाठी काय करू शकेन’ हा विचार अधिक प्रेरकच केव्हाही! हा सगळा हलकासा नजरेतला बदल आहे; तेवढाच फक्त आपल्याला करायचाय!
...बाकी, ज़िंदगी तर गुलज़ार आहेच! 
२०२५ चे मनःपूर्वक स्वागत आणि शुभचिंतन! 
    sonali.lohar@gmail.com

Web Title: A book with 12 lessons and 365 blank pages will be available tomorrow but what is Next?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.