शिल्पा मोहिते, दुबईस्थित अभियंता तंत्रज्ञान, संस्कृती यावर लेखन
‘यूएई’मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यापासून एक गोष्ट सतत जाणवते. ज्या बातम्यांमधून माणसांच्या मनात लपून बसलेल्या भीतीचं दर्शन घडतंय त्याच बातम्यांमधून माणसांच्या मनातल्या मानवतेचं दर्शनही घडतंय. युद्ध सुरू होण्याआधी माझी आई काही दिवस दुबईला आली होती. तिला मधुमेह आहे. येताना जेवढे दिवस राहायचं आहे तेवढे दिवस पुरतील एवढीच औषधं तिने आणली होती. युद्ध सुरू झालं. मुक्काम लांबला. स्थानिक डॉक्टरचं प्रिस्क्रिपशन नसेल तर इथे ती औषधं मिळत नाहीत. आता काय करायचं असा विचार करत असताना समोर आला तो एक सुरेख माणुसकीचा सेतू.
या सेतूच्या एका बाजूला भारत आणि महाराष्ट्र सरकारच्या मदतीने सुरू झालेली ‘आयपीएफ’ महा-हेल्पलाइन होती, तर दुसऱ्या बाजूला यूएई सरकारने केलेली मजबूत व्यवस्था. या उपक्रमात अनेक स्वयंसेवक, डॉक्टर, ट्रॅव्हल एजंट्स आणि विविध क्षेत्रांतील लोक एकत्र आले होते. दुबई आणि अबुधाबीतील मराठी डॉक्टरांना त्यात जोडण्यात आलं होतं. एक आजी अचानक आजारी पडल्या. त्यांना इथल्या इन्शुरन्स, सेकंड ओपिनियन अशा गोष्टींची साहजिकच माहिती नव्हती. अशा वेळी डॉक्टरांशी थेट संपर्क झाल्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शनही मिळालं.
या काळात लोकांच्या अडचणी साध्या तरी गंभीर होत्या. काही हाय बीपी, डायबेटिसचे रुग्ण, तर काही कॅन्सर पेशंटही होते. मुक्काम लांबल्यावर त्यांच्यासाठी वेळेत औषधांची व्यवस्था करणं, डॉक्टरांशी संपर्क करून देणं हे सगळं या स्वयंसेवकांनी सुरळीत आणि कुठलाही बोभाटा न करता केलं. त्यामुळेच माझ्या आईचीही औषधं वेळेत मिळाली आणि आम्ही निश्चिंत झालो.
प्रवासासाठीही तीन विश्वासार्ह एजंट्स नेमून देण्यात आले. मार्जिन कमी ठेवा, अडकलेल्या लोकांना खात्रीशीर तिकिटं द्या, अशा स्पष्ट सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. सीनियर सिटिझन्स, लहान मुलं असलेली कुटुंबं.. असे वेगवेगळे गट तयार करण्यात आले. ही मंडळी पर्यटक म्हणून आली होती. त्यामुळे लांबलेल्या मुक्कामाचा भार झेपेल अशी सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती नव्हती; पण अनेक स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. कोणी घरून डबे पाठवले. कोणी राहण्याची सोय केली. कोणी या लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांना धीर दिला.
या प्रयत्नांमागे ‘युनायटेड महाराष्ट्र’ हा एक मोठा प्लॅटफॉर्म उभा होता. त्यात सुमारे ३५ वेगवेगळ्या संस्था- महाराष्ट्र मंडळं, धार्मिक संस्था, व्यावसायिक गट, क्रीडा गट एकत्र आले होते. कोण अजमानमध्ये, कोण रास-अल-खैमामध्ये, कोण दुबईत, तर कोण अबुधाबीमध्ये.. या काळात डॉ. धीरज जैन यांनी एक आगळा आदर्श घालून दिला. डॉ. धीरज जैन मूळचे महाराष्ट्रातले. त्यांनी अजमानमधलं आपलं फार्महाऊस अडकलेल्या लोकांसाठी खुलं केलं आणि तब्बल ५०० लोकांसाठी बेड्सची सोय करण्यात आली.
ही फक्त व्यवस्था नसून त्यांना तात्पुरतं ‘घर’ देण्याची भावना होती. लोकांना आणण्यासाठी आलिशान गाड्या पाठवण्यात आल्या, सकाळी योगा, जैन कुटुंबीयांबरोबर नाश्ता, जेवण, क्रिकेटचे सामने दाखवण्याचीही सोय केली गेली. या सगळ्या प्रयत्नांतून, बहुतेक सगळे लोक सुरक्षितपणे परत गेले. काहींचे सुखरूप पोहोचल्याचे कृतज्ञ निरोपही आले.. Shiloo75@gmail.com
Web Summary : During a crisis, the UAE showcased remarkable humanity by aiding stranded Indians. Volunteers, doctors, and organizations united to provide medicine, accommodation, and travel assistance, ensuring safe return.
Web Summary : संकट के दौरान, यूएई ने फंसे हुए भारतीयों की मदद करके उल्लेखनीय मानवता का प्रदर्शन किया। स्वयंसेवकों, डॉक्टरों और संगठनों ने दवा, आवास और यात्रा सहायता प्रदान की, जिससे सुरक्षित वापसी सुनिश्चित हुई।