गाझामधलं अल शिफा हे प्रसिद्ध रुग्णालय. या रुग्णालयाच्या बाहेर एक तंबू लावलेला आहे. यात बहुसंख्य पत्रकार राहतात. - कारण गाझातील अल शिफा रुग्णालय हे सध्या ‘मोस्ट हॅपनिंग’ ठिकाण आहे. हमास आणि इस्त्रायल यांच्यात यु्द्ध सुरू झाल्यापासून जे शेकडो लोक मृत्युमुखी पडले, पडताहेत, जखमी होताहेत, त्यांना मुख्यत: याच ठिकाणी आणलं जातं. युद्धाची दाहकता कळण्यासाठी आणि जगापर्यंत ते पोहोचवण्यासाठी गाझामधलं हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. त्यामुळेच देशी-विदेशी पत्रकार या ठिकाणी येतात.
अनस अल-शरीफ हा २८ वर्षीय तरुण पत्रकार नुकताच इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेला. तोही याच तंबूत राहात होता. या हल्ल्यात त्याच्यासह एकूण सात पत्रकार मारले गेले. ‘अल जझीरा’नं दिलेल्या वृत्तानुसार मृतांमध्ये अनससह मोहम्मद करीकेह, कॅमेरामन इब्राहिम जहीर, मोआमेन अलीवा आणि मोहम्मद नौफल यांचाही समावेश आहे.
युद्धाच्या ठिकाणी वार्तांकन करणं कधीच सोपं नसतं. अनेक धाडसी पत्रकार आपल्या जिवावर उदार होऊनच अशा ठिकाणी वार्तांकन करीत असतात. अनेकांना वाटतं की, अशा ठिकाणी पत्रकारांच्या सुरक्षेची व्यवस्था केलेली असते. पण, बहुतांश वेळा असला काहीही प्रकार नसतो. पत्रकारांना स्वत:लाच आपली जबाबदारी घ्यावी लागते आणि सर्वसामान्य माणसं ज्या हालअपेष्टांत जगतात, त्याला सामोरं जात त्यांनाही बातमीदारी करावी लागते. - बऱ्याचदा कर्तव्य म्हणून, आपल्या कामाचा भाग म्हणून! जे जे घडतंय ते जगापर्यंत पोहोचावं, जगाला जे माहीत नाही, ते आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून हे पत्रकार हरघडी मृत्यूशी झुंज घेत असतात. अशा पत्रकारांचं काम सैनिकांपेक्षा कमी मोलाचं नसतं किंबहुना सैनिकांच्याही जिवाला नसेल इतका धोका या पत्रकारांना असतो. त्याचं प्रत्यंत्तर हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धातही आलंच.
या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या सुमारे २०० पत्रकारांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अनस अल-शरीफ हा त्यातलाच एक. युद्धाच्या प्रसंगी सर्वसामान्यपणे कोणताही देश ‘मुद्दाम’ पत्रकारांना लक्ष्य करीत नाही, अनसला मात्र इस्रायलनं मुद्दाम टिपून मारलं. इस्रायली लष्कराच्या मते अनस हा दहशतवादी होता आणि पूर्वी हमासमधील एका दहशतवादी गटाचा प्रमुख म्हणून तो काम करीत होता. इस्रायली नागरिकांवर आणि सैनिकांवर रॉकेट हल्ले घडवून आणणं, हे त्याचं काम होतं. त्यासाठी इस्रायली सोशल मीडिया हँडल्सवरून अनसचा एक फोटोही शेअर करण्यात आला, ज्यामध्ये तो हमासचे माजी प्रमुख याह्या सिनवार यांच्यासोबत दिसतो आहे. गेल्या वर्षी इस्रायलनं एका ड्रोन हल्ल्यात सिनवारला टिपलं होतं. अनस हा गाझामधून रिपोर्टिंग करणाऱ्या प्रसिद्ध पत्रकारांपैकी एक होता. २०१८ साली त्याला ‘सर्वोत्तम युवा पत्रकार’ या पुरस्कारानंही गौरवण्यात आलं होतं.
अनसच्या वडिलांचा मृत्यूही डिसेंबर २०२३मध्ये इस्रायली बॉम्बहल्ल्यात झाला होता. ते जबालिया शरणार्थी छावणीत होते. त्यावेळी अनसनं म्हटलं होतं, माझं घर उद्ध्वस्त झालं आहे, वडिलांची हत्या झाली आहे, कदाचित माझाही जीव जाईल. पण, तरीही गाझामधून मी रिपोर्टिंग करतच राहीन... दुर्दैवानं त्याचं म्हणणं खरं ठरलं.