१९३ वर्षांपूर्वी बॉम्बेमध्ये कुत्र्यांवरून दंगल उसळली, तेव्हा.. ‘बॉम्बे डॉग रायट्स’चा इतिहास

By संदीप प्रधान | Updated: August 19, 2025 10:59 IST2025-08-19T10:58:46+5:302025-08-19T10:59:11+5:30

१८३२ च्या ‘बॉम्बे डॉग रायट्स’ला मुंबई शहराच्या इतिहासात एक खास स्थान आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला असताना एक जुना धांडोळा..

193 years ago, when riots broke out in Bombay over dogs... The history of the 'Bombay Dog Riots' | १९३ वर्षांपूर्वी बॉम्बेमध्ये कुत्र्यांवरून दंगल उसळली, तेव्हा.. ‘बॉम्बे डॉग रायट्स’चा इतिहास

१९३ वर्षांपूर्वी बॉम्बेमध्ये कुत्र्यांवरून दंगल उसळली, तेव्हा.. ‘बॉम्बे डॉग रायट्स’चा इतिहास

संदीप प्रधान, सहयोगी संपादक, लोकमत, ठाणे

ब्रिटिश आमदनीत मुंबईतील काही क्लब व ठिकाणांच्या बाहेर ‘कुत्रे व भारतीय यांना प्रवेश बंद’ असे फलक लावलेले असायचे. ब्रिटिशांचा भारतीयांवरील राग एकवेळ समजू शकतो; पण कुत्र्यांवर राग असण्याची कहाणी तब्बल १९३ वर्षांपूर्वीची आहे. याच मुंबईत भटक्या कुत्र्यांमुळे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्याहून धक्कादायक म्हणजे त्या दंगलीचे नेतृत्व मुंबईतील शांतताप्रिय अशी ओळख असलेल्या पारशी समाजाने केले. त्यामध्ये त्यांना हिंदू, मुस्लीम, जैन धर्माच्या लोकांची साथ लाभली. १८५७चे बंड हे भारतीय ऐक्याचे उदाहरण मानले जाते. पण, मुंबई कॉस्मोपॉलिटन शहराने ब्रिटिशांविरुद्ध त्यापूर्वीच ऐक्याचे दर्शन घडवले.

सन १८३२. बॉम्बे (आजचे मुंबई) हे एक गजबजलेले बंदर व विविध संस्कृती आणि समुदायांचे वास्तव्य असलेले शहर तेव्हाही होते. त्यामध्ये पारशी समाजाने आपले व्यावसायिक कौशल्य, दानशूरपणाने आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. खरे तर शांतता हा पारशांचा स्थायिभाव, पण या समाजानेच शहराच्या इतिहासातील पहिल्या मोठ्या दंगलींपैकी एकाचे नेतृत्व केले आणि तेही भटक्या कुत्र्यांसाठी. या संघर्षाची मुळे थेट १८१३ मध्ये सापडतात. त्यावर्षी ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी ‘बॉम्बे’मधील कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी एक नियम जाहीर केला. भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यास परवानगी दिली होती. काही वर्षे हा नियम मुक्तहस्ते अंमलात आला. मात्र तरीही १८३२ पर्यंत शहरातील कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली आणि प्रशासनाने हा नियम अधिक कठोरपणे लागू केला. एक कुत्रा मारल्याबद्दल आठ आणे बक्षीस देण्यात येत असे.

लवकरच या धोरणाचे अनियंत्रित परिणाम दिसू लागले. बक्षिसाच्या हव्यासाने कुत्रे पकडणाऱ्यांनी फक्त भटक्या कुत्र्यांवरच नव्हे, तर पाळीव कुत्र्यांवरही हल्ला करायला सुरुवात केली. घरात घुसून कुत्रे मारण्याच्या घटना घडू लागल्या. यामुळे लोकांमध्ये व मुख्यत्वे पारशी समाजात संताप पसरला. पारश्यांसाठी कुत्रा हा फक्त पाळीव प्राणी नव्हे, तर त्यांच्या झोराष्ट्रीयन धर्माचा अविभाज्य भाग होता. पारशी धार्मिक ग्रंथांनुसार कुत्र्यांना स्वर्गाचे द्वारपाल मानले जात असे आणि त्यांची दृष्टी वाईट शक्तींना दूर करते असे मानले जाई. कुत्र्यांची अंदाधुंद हत्या हा त्यांच्या धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक प्रथा यांच्यावर थेट आघात होता.

या संतापाचा विस्फोट ६ जुलै १८३२ रोजी झाला. बॉम्बेच्या फोर्ट भागात कुत्रे पकडणारे आपले काम करत होते. त्यातच एकत्र आलेल्या सुमारे २०० पारशी बांधवांनी आंदोलन सुरू केले. यात दोन पोलिस हवालदार जखमी झाले. हळूहळू आंदोलनाचे लोण पसरले. दुकाने, व्यापार बंद झाले. हिंदू, जैन आणि मुस्लीम समाजही  या आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाच्या तीव्रतेने व मुंबईतील नागरिकांच्या एकोप्याने ब्रिटिश अधिकारी थक्क झाले. लष्करी तुकड्या बोलावून दंगल थोपवण्याचा प्रयत्न झाला. जमावासमोर दंगलविरोधी कायदा वाचण्यात आला. काही पारशी नेत्यांना अटक केली गेली. या अटकेमुळे संताप आणखीनच वाढला. शहरातील व्यापारउदीम ठप्प झाला. ब्रिटिशांवर दबाव निर्माण झाला. अखेर ब्रिटिशांना नमते घ्यावे लागले.

ब्रिटिश प्रशासनाने पारशी नेत्यांशी चर्चा सुरू केली. प्रसिद्ध व्यापारी सर जमशेटजी जीजीभॉय यांच्या नेतृत्वाखाली या समाजाने कुत्र्यांची कत्तल थांबवण्याची मागणी करून भटक्या कुत्र्यांना शहराबाहेर हलविण्याचा प्रस्ताव मांडला. शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटिशांनी ही मागणी मान्य केली. कुत्र्यांची कत्तल अनिवार्य करणारा नियम मागे घेतला. अटक केलेले पारशी नेते मुक्त केले. या १८३२च्या ‘बॉम्बे डॉग रायट्स’ने शहराच्या इतिहासावर कायमस्वरूपी छाप सोडली. या घटनेतून पारशी समाजाची प्रभावी संघटनशक्ती आणि नेतृत्वगुण अधोरेखित झाले. त्याचबरोबर विविध धर्मीयांच्या एकतेचेही दर्शन घडले. ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्या मनमानी धोरणांना स्थानिकांच्या धार्मिक भावना किती जोरकस आव्हान देऊ शकतात, हे या दंगलीने दाखवून दिले. या संघर्षाचा केंद्रबिंदू प्राण्यांबद्दलची करुणा होती. 
या घटनेला आज १९३ वर्षे झाली, तरी भटक्या कुत्र्यांची समस्या अजून सुटलेली नाही.

sandeep.pradhan@lokmat.com

Web Title: 193 years ago, when riots broke out in Bombay over dogs... The history of the 'Bombay Dog Riots'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.