‘मसाप’ : १२० वर्षांच्या वाटचालीची समृद्ध कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 07:09 IST2025-05-26T07:07:04+5:302025-05-26T07:09:15+5:30
महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा १२० वा वर्धापन दिन २६ व २७ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त..

‘मसाप’ : १२० वर्षांच्या वाटचालीची समृद्ध कहाणी
मृणालिनी कानिटकर - जोशी
ज्येष्ठ कवयित्री
कालपटलावरची ११९ वर्षे सरली आहेत. या शतकाने अनेक चढ-उतार पाहिले. देशाचा स्वातंत्र्य लढा, सामाजिक समतेसाठी-बंधुतेसाठी चाललेल्या चळवळी, स्त्री शिक्षण, रुढी परंपरांच्या जोखडातून मुक्त होण्याचे प्रयास इथपासून ते आजच्या अनेक चांगल्या वाईट बदलांची साक्ष देणाऱ्या संगणकीय क्रांतीच्या युगापर्यंतची ही वाटचाल. या वाटचालीत साहित्यिकांच्या आधुनिक उदारमतवादी विचारांचा आणि त्यातून निर्माण झालेल्या साहित्याचा मोठा प्रभाव समाजमनावर पडला.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात न्यायमूर्ती रानडे व लोकहितवादी यांनी ग्रंथकार संमेलनाची सुरुवात केली होती. समाजहिताच्या दृष्टीने वैचारिक आदान-प्रदान व्हावे, तसेच साहित्य परंपरा टिकून राहावी हा त्यामागचा उद्देश. चौथे ग्रंथकार संमेलन २७ मे १९०६ रोजी मळेकर वाड्यात भरले होते. प्रसिद्ध कवी गोविंद वासुदेव कानिटकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. या संमेलनाच्या समारोपप्रसंगी साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेची घोषणा केली. लोकमान्य टिळकांनी त्याला अनुमोदन दिले आणि महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक जडण घडणीचा, संवर्धनाचा जणू पायाच रचला गेला. या नंतरच्या १२० वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्र साहित्य परिषदेने (मसाप) हा वारसा अतिशय कसोशीने जपला, संवर्धित केला.
मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन ही अतिशय वेगळी संकल्पना महाराष्ट्र साहित्य परिषदेने यशस्वी करून दाखवली. आतापर्यंत झालेल्या ९८ साहित्य संमेलनांपैकी पहिली ४५ संमेलने महाराष्ट्र साहित्य संमेलन या नावाने महाराष्ट्र साहित्य परिषदेने भरविली होती. पुढे १९६० साली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाल्यावर ही संमेलने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या नावाने आयोजित केली जातात. साहित्य संमेलनाची अशी दीर्घ आणि समृद्ध परंपरा मराठी भाषेतच आढळते. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था. या संस्थेच्या स्थापनेपासून ते आजवर परिषदेने साहित्य सेवेची आपली परंपरा अखंडीत चालू ठेवली आहे. गेल्या दोन दशकात तर परिषदेत अनेक चांगले बदल घडून आले आहेत. अधिकाधिक लेखक, कवी, वाचक, रसिक परिषदेशी जोडले जात आहेत. फक्त पुण्यातच नाही तर लहान-लहान गावांतील साहित्यिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी परिषद कटिबद्ध आहे. परिषदेच्या कार्यक्षेत्रातील १६ जिल्ह्यांतील गावांमध्ये परिषदेच्या शाखा आहेत. त्यांच्या मार्फत अनेक उपक्रम घेतले जातात. शिवार संमेलनांची कल्पना तर अतिशय यशस्वी आणि लोकप्रिय झाली आहे. परिषदेकडे मोठ्या विश्वासाने पुरस्कार देण्यासाठी अनेक देणग्या सुपुर्द केल्या जातात. या पुरस्कारांसाठी योग्य व्यक्तीची निवड करून त्यांना पुरस्काराने गौरविले जाते.
मराठी भाषेची गळचेपी होऊ नये, तसेच महाराष्ट्रातच मराठी उपेक्षित राहू नये, यासाठी महाराष्ट्रात मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करावा, यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात साहित्य परिषदेचा महत्वपूर्ण सहभाग होता. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी परिषदेने सातत्याने पाठपुरावा केला. पंतप्रधान कार्यालयाला शालेय विद्यार्थ्यांद्वारे एक लाख पत्रे पाठवणे, सततचा पत्रव्यवहार, दिल्लीत धरणे आंदोलन अशा अनेक मार्गांचा वापर करून आपली मागणी सरकारसमोर प्रभावीपणे मांडली. मराठी भाषेच्या प्रसार व वृद्धीसाठी परिषदेतर्फे मराठी भाषेचे वर्ग व परीक्षा घेतल्या जातात.
साहित्य परिषदेचे अतिशय महत्त्वाचे कार्य म्हणजे मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांमध्ये प्रकाशित करून आपल्या अमूल्य साहित्यिक व सांस्कृतिक ठेव्याचे जतन परिषदेने केले. बदलत्या काळाला अनुसरून हे खंड ई-बुक स्वरूपातही आणले आहेत. परिषदेच्या वास्तूच्या नूतनीकरणाचे काम कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्यासह कोशाध्यक्ष सुनिताराजे पवार, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि सर्व कार्यकारी मंडळाने यशस्वी केले.
येत्या तीन वर्षांसाठी साहित्य महामंडळाचे कार्यालय पुण्याकडे आले आहे. ९९, १०० आणि १०१ वे साहित्यसंमेलन आयोजित करण्याची संधी महाराष्ट्र साहित्य परिषदेला मिळणार आहे. सकस साहित्यातून निरोगी समाजमने घडविण्याच्या उद्दिष्टाचा प्रभाव या साहित्य संमेलनांवर नक्की दिसेल आणि साहित्याच्या या समृद्ध आणि वैभवी परंपरेचा वारसा परिषद समर्थपणे पुढे नेईल, याची खात्री वाटते.