निवडणुकीच्या माध्यमातून तरूणांचा राजकारणात दमदार प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 12:52 IST2020-01-12T12:52:27+5:302020-01-12T12:52:43+5:30
धुळे जिल्ह्यातील गट-गणातून विजयी झालेले तरूण अवघे २२ ते ३० वयोगटातील

निवडणुकीच्या माध्यमातून तरूणांचा राजकारणात दमदार प्रवेश
अतुल जोशी ।
आॅनलाइन लोकमत
धुळे : जगात भारत हा देश तरूणांचा देश म्हणून ओळखला जातो. आज २१ व्या शतकात कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्र युवक-युवतींनी व्यापलेली आहे. त्याला आता राजकारणही अपवाद राहिलेले नाही. जिल्ह्यातील राजकारणातही युवा पिढी सक्रीय झालेली आहे. केवळ सक्रीयच नव्हे तर अनेक युवक-युवतींनी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विजय मिळवित दमदार ‘एन्ट्री’ केलेली आहे.
धुळे जिल्हा हा समृद्ध राजकारणासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपल्या वक्तृत्व, व कार्यशैलीच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात अढळ स्थान पटकावलेले आहे. धुळे जिल्ह्याचे नाव काढताच रंगराव माधवराव पाटील, तत्कालीन आमदार द.वा. पाटील, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव रणधीर, माजी मंत्री रोहीदास पाटील, माजी मंत्री अमरिशभाई पटेल, माजी मंत्री शालीनी बोरसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. मात्र कालौघात अनेकजण राजकारणातून निवृत्त झालेले आहे. असे असले तरी राजकीय वारसा लाभलेल्या तरूण नेतृत्वाने जिल्ह्याला दिशा देण्याचे प्रयत्न केले आहे. भारत २०२० मध्ये महासत्ता बनेल असे तत्कालीन राष्टÑपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी भाकित वर्तविले होते. आपण नुकताच २०२० मध्ये प्रवेश केलेला आहे. भारत महासत्ता तरूणांच्या जोरावरच बनू शकणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याचा विकास हा तरूण नेतृत्वाकडूनच होवू शकतो असा जिल्हावासियांना विश्वास आहे. तरूणांमध्ये अफाट कल्पनाशक्ती असल्याने, त्याचा उपयोग जिल्ह्याचा विकासासाठी होईल अशी अपेक्षा आता सर्वांनाच आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारांनी आपल्या भागाचे प्रतिनिधीत्व करण्याची तरूणांना संधी दिली आहे.
नुकत्याच जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी जिल्ह्यात निवडणुका झाल्या. या निवडणुकीत राजकीय पार्श्वभूमि लाभलले व सर्वसामान्य घरातील तरूण-तरूणींनीही आपले भाग्य अजमावून बघितले. यात त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळविले. अनेक तरूण उमेदवारांनी मातब्बरांचा पराभव करीत जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये धडाक्यात प्रवेश केलेला आहे. यात शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर फॉरेस्ट येथील रहिवाशी व कोडीद गटातून विजयी झालेल्या अनिता रतनबाई पावरा,जळोद (ता.शिरपूर) गणातून निवडून आलेले राहूल राजेश पावरा, नगाव (ता.धुळे) गटातून निवडून आलेले राघवेंद्र उर्फ राम मनोहर पाटील, शिरूड गणातून निवडून आलेले आशुतोष विजय पाटील, निजामपूर गटातून निवडून आलेले हर्षवर्धन शिवाजी दहिते,मैदाणे गणातून विजयी झालेल्या संगीता गणेश गावीत, चिकसे गणातून विजयी झालेले अजय भगवान सूर्यवंशी या तरूण राजकारण्यांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेचे गट व त्या-त्या तालुक्यातील पंचायत समितींच्या गणातून निवडणून आलेले हे युवा राजकीय नेते अवघ्या २२ ते ३० वयोगटातील आहे. यापैकी काही युवा नेत्यांनी मातब्बरांचे वर्चस्व झुगारून केवळ आपल्या कृर्तत्वाच्या जोरावर पंचायत समितींमध्ये प्रवेश केलेला आहे.
आजच्या युवा पिढीला आपल्या भागातील समस्या काय व त्यावर काय उपाययोजना करता येतील याची चांगलीच जाण आहे. आजची युवा पिढी सोशल मीडीयावरही मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे. त्यामुळे या युवा नेत्यांकडून गट व गणातील नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. निवडून आलेली तरूण मंडळी निश्चितच आपल्या भागाचा विकास साधतील असा विश्वास असल्याने, मतदारांनीही त्यांना आपल्या गट-गणाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिलेली आहे. या संधीचे कितीजण सोने करतात याची उत्सुकता आहे.