धुळे जिल्हा परिषदेत नेतृत्वाची संधी कोणाला मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:27 IST2019-11-25T11:27:32+5:302019-11-25T11:27:49+5:30

भाजप बाहेरचे नेतृत्व देणार की जिल्ह्यातील स्थानिकाला संधी देणार याची उत्सुकता

 Who will get the opportunity to lead the Dhule Zilla Parishad? | धुळे जिल्हा परिषदेत नेतृत्वाची संधी कोणाला मिळणार?

धुळे जिल्हा परिषदेत नेतृत्वाची संधी कोणाला मिळणार?

आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने, राजकीय पक्षांनी आता मोर्चे बांधणीला हळूहळू सुरूवात केलेली आहे. विधानसभेपाठोपाठ जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्हा परिषदेची निवडणूक अतिशय महत्वाची आहे. भाजपकडून या निवडणुकीचे नेतृत्व करण्याची संधी कोणाला मिळणार? नेतृत्व बाहेच्या जिल्ह्यातील देणार की जिल्ह्यातील नेत्यांना संधी मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सर्वच पक्षाच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
गेल्या पाच वर्षांपासून राज्यात सर्वत्र भाजपचे वर्चस्व वाढले होते. या वर्चस्वाच्या बळावरच जिल्ह्यात भाजपने महापालिकेवर प्रथमच भगवा फडकवला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने अपेक्षित यश मिळविल्याने, कॉँग्रेसच्या बालेकिल्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली. भाजपने जरी मनपा, लोकसभा निवडणुकीत यश मिळविले असले तरी, त्याचे नेतृत्व कोणी करावे यावरूनच वादाची ठिणगी पडली होती. मनपाच्या निवडणुकीत भाजपचे नेतृत्व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दिले होते. त्याला पक्षातील काहींनी खुला विरोध केला होता. यात भाजपच्याच तत्कालीन आमदारावर कारवाई करण्यात आली होती.
मनपा निवडणुकीनंतर मोदी लाटेत धुळे लोकसभा मतदार संघात भाजपने विजय मिळविला. मात्र त्याची पुनर्रावृती अवघ्या पाच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला करता आली नाही. विधानसभा निवडणुकीतही नेतृत्वाबद्दल अंतर्गत धूसफूस होतीच. त्यामुळे भाजप-सेना युती असतांनाही त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आले. जिल्ह्यात भाजपला अवघ्या दोन जागांवरच समाधान मानावे लागले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात राजकीय समिकरण झपाट्याने बदललेले आहे. त्यामुळे भाजप विरूद्ध सर्व पक्ष असे समिकरण तयार झालेले आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपतर्फे दुसऱ्या जिल्ह्याचे नेतृत्व दिल्यास त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीप्रमाणेच उमटू शकतात अशी शक्यता आतापासून व्यक्त होत आहे.
अशा स्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये नेतृत्वाची संधी कोणाला मिळणार याची उत्सुकता आता जिल्हावासियांना लागली आहे.
जिल्हा परिषदेचे एकूण ५६ गट असून, त्यापैकी सर्वाधिक १७ गट साक्री तालुक्यात, त्याखालोखाल १५ गट धुळे तालुक्यात १४ गट शिरपूर तालुक्यात व १० गट शिंदखेडा तालुक्यात आहे. त्यातच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण गटासाठी निघालेले आहे.
साक्री तालुक्यात पाच व शिरपूर तालुक्यात तीन गट सर्वसाधारण आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाकडे नजर ठेवूनच सक्षम नेतृत्वाची निवड करावी लागणार आहे.
भाजप-सेना युती संपुष्टात आलेली आहे. अशा स्थितीत भाजपला यश मिळवायचे असल्यास बाहेरचे नेतृत्व लादण्यापेक्षा पक्षश्रेष्ठींना जिल्ह्यातील नेतृत्वावरच विश्वास दाखवावा लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीअगोदर माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी भाजपत प्रवेश केला. त्यांच्यामुळे शिरपूर तालुक्यात प्रथमच ‘कमळ’ फुलले आहे. त्यामुळे जि.प. निवडणुकीचे नेतृत्व करण्यासाठी अमरिशभाई पटेल यांचे नाव आघाडीवर राहण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ माजी मंत्री व विद्यमान आमदार जयकुमार रावल, माजी केंद्रीय राज्यमंत्री व विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे, यांचेही नाव या निवडणुकीच्या नेतृत्वासाठी पुढे होऊ शकते अशी चर्चा आहे. अर्थात पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, यावरही सर्व समिकरणे अवलंबून राहण्याची शक्यता आहे. भाजपचे नेतृत्व कोणाकडे राहणार हा प्रश्न गुलदस्त्यात असला कॉँग्रेस राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे जिल्ह्यातील नेत्यांनाच नेतृत्वाची संधी दिली जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title:  Who will get the opportunity to lead the Dhule Zilla Parishad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे