कुटुंबातील तरुणांचे लसीकरण कधी; ज्येष्ठांना सतावते आहे चिंता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:38 IST2021-05-21T04:38:08+5:302021-05-21T04:38:08+5:30
धुळे : कुटुंबातील तरुणांना रोजगारासाठी, नोकरीसाठी आणि खरेदीसाठी नेहमी बाहेर जावे लागते. परंतु त्यांचे लसीकरण बंद केल्याने ज्येष्ठांची चिंता ...

कुटुंबातील तरुणांचे लसीकरण कधी; ज्येष्ठांना सतावते आहे चिंता!
धुळे : कुटुंबातील तरुणांना रोजगारासाठी, नोकरीसाठी आणि खरेदीसाठी नेहमी बाहेर जावे लागते. परंतु त्यांचे लसीकरण बंद केल्याने ज्येष्ठांची चिंता वाढली आहे. तरुणांचे लसीकरण कधी सुरू होणार याची प्रतीक्षा साऱ्यांनाच आहे.
गेल्या १ मे पासून तरुणांचे लसीकरण सुरू केले होते. धुळे जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील १७ हजार ८०० तरुण-तरुणींचे लसीकरण झाले. त्यांना पहिला डोस मिळाला आणि तरुणांचे लसीकरण बंदचे आदेश आले. त्यामुळे दुसरा डोस मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरुणांचे लसीकरणदेखील त्वरित सुरू करावे, अशी मागणी ज्येष्ठांकडून केली जात आहे.
धुळे जिल्ह्याला आतापर्यंत २ लाख ७४ हजार लस मिळाल्या आहेत. त्यापैकी २ लाख ६४ हजार नागरिकांचे लसीकरण झाले असून १० हजार डोस शिल्लक आहेत. आतापर्यंत २ लाख ८ हजार नागरिकांना पहिला तर ५३ हजार ९०० नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे. ४४ वर्षावरील १ लाख ६० हजार जणांना पहिला तर ४१ हजार नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
४५-६०
पहिला डोस १,६०,०००
दुसरा डोस ५३०००
१८-४४
पहिला डोस १७ ८००
दुसरा डोस ००००
तरुण कामानिमित्त बाहेर जातात, त्यांनाही लवकर लस मिळावी
घरातील तरुण मुलांना कामासाठी दिवसभर बाहेर जावे लागते. अनेकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे त्यांचे लसीकरण त्वरित सुरू करावे. - भटू गडवे, चितोड, ता. धुळे
माझा मुलगा कंत्राटी तत्त्वावर कामाला जातो. त्याचे काम जनसंपर्काशी संबंधित असल्याने कितीही काळजी घेतली तरी धोका आहेच. कुटुंबातील सर्वजण चिंतेत असतात. त्यामुळे तरुणांना देखील लस द्यावी. - सुरेंद्र पाटील, धुळे
पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात शासन अपुरे पडत आहे. त्यामुळे तरुणांचे सुरू असलेले लसीकरण बंद करण्याची नामुष्की शासनावर ओढवली. हा शासनाचा दोष आहे. त्यांच्यामुळे तरुण वर्ग असुरक्षित आहे. - प्रकाश चव्हाण, धुळे