या वेबिनारमध्ये दोंडाईचा येथील प्रसिद्ध डाएट न्युट्रिशन एडव्हायजर व योगा ट्रेनर अँड कोच डॉ. स्वाती महेंद्र सोनवणे यांनी मुलांच्या वाढत्या वयात पोषक आहाराचे महत्त्व या विषयावर तसेच हस्ती स्कूलच्या माजी विद्यार्थिनी व पेडिएट्रिक डेंटिस्ट डॉ. ऐश्वर्या अशोक जैन यांनी मुलांच्या दाताची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी शालेय समिती चेअरमन कैलास जैन, स्थानिक शालेय सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. विजय नामजोशी तसेच प्राचार्य हरिकृष्ण निगम हे मान्यवर उपस्थित होते.
डॉ. स्वाती सोनवणे म्हणाल्या की, मुलांना दैनंदिन आहारातूनच पोषक घटक मिळतात. यात कार्बोहायड्रेट, प्रोटिन्स, व्हिटॅमिन, फॅट्स, मिनरल, वॉटर इ. शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक कोणत्या अन्न पदाथार्तून मिळतात? याबाबत माहिती सांगितली. तसेच मुलांच्या शरीराला गरज असणारे सर्व खाद्य पदार्थ खाण्याची सवय पालकांनी लावावी. यासाठी पालकांनी कोणते वेगवेगळे प्रयोग करावेत? याचेही मार्गदर्शन केले. तसेच मुलं घडविताना माता-पालकसह पिता पालकांचीही तेवढीच जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले.
यानंतर दातांची काळजी या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ. ऐश्वर्या जैन यांनी पालकांनी आपल्या मुलांच्या दातांची निगा कशी राखावी? याकरिता मुलांना कोणत्या व कशा सवयी लावाव्यात? याबाबत उपयुक्त माहिती दिली. सोबतच यासाठी पालकांना दहा प्रकारच्या टिप्सही समजावून सांगितल्या. यात डेंटिस्ट व्हिजिट करणे, पालकांसोबत मुलांनीही ब्रश करणे, ब्रश व टूथ पेस्ट कोणते वापरावे? ब्रश कसा आणि किती वेळ करावा? मुलांचे गोड पदार्थ खाण्याचे प्रमाण कसे व किती असावे? मुलांनी अंगठा किंवा बोट चघळणे, तोंड उघडे ठेवून झोपणे, झोपेत दातांचा आवाज करणे, यांचा मुलांच्या दातांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम काय? तसेच पालकांनी मुलांचे दात साफ करणे संदर्भात दैनंदिन वेळापत्रक बनविणे आणि शिक्षकांनीही मुलांना ब्रश करून दात सफाईबाबत विचारणा करणे याबाबतही मार्गदर्शन केले. वेबिनारच्या शेवटी पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन शंका समाधानही डॉ. स्वाती सोनवणे व डॉ. ऐश्वर्या जैन यांनी केले.
यानंतर कैलास जैन व डॉ. विजय नामजोशी यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. वेबिनार यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका पूनम पाटील, बालवाडी समन्वयिका स्मिता साठे, समन्वयिका लीना सोनवणे व विशाखा पाटील तसेच शिक्षिका वृंद यांनी परिश्रम घेतले.