मतदार यादीत सर्व मतदारांची छायाचित्रे समाविष्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:37 IST2021-05-19T04:37:03+5:302021-05-19T04:37:03+5:30
धुळे : सातबारा संगणकीकरणात राज्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या धुळे जिल्ह्याने आणखी एक यशस्वी कामगिरी बजावली आहे. धुळे जिल्ह्यातील सर्वच्या ...

मतदार यादीत सर्व मतदारांची छायाचित्रे समाविष्ट!
धुळे : सातबारा संगणकीकरणात राज्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या धुळे जिल्ह्याने आणखी एक यशस्वी कामगिरी बजावली आहे. धुळे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. अशी कामगिरी करणारा धुळे जिल्हा हा राज्यात तिसरा, तर नाशिक विभागात प्रथम ठरला आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे यांनी ही माहिती दिली.
धुळे जिल्ह्यात लोकसभेचा धुळे मतदारसंघ आहे. या मतदारसंघात धुळे ग्रामीण, धुळे शहर आणि शिंदखेडा या विधानसभांच्या मतदारसंघांचा, तर साक्री आणि शिरपूर या विधानसभा मतदारसंघांचा लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघात समावेश आहे. ८ लाख ६३ हजार २१३ पुरुष, ८ लाख ७ हजार ५१४ महिला, तर २३ ट्रान्सजेंडर मतदार मिळून एकूण १६ लाख ७० हजार ७५० मतदार आहेत. या मतदारांपैकी ३८ हजार ९५ मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत समाविष्ट नसल्याचे निवडणूक शाखेच्या निदर्शनास आले, तसेच मतदार यादीतील प्रत्येक मतदाराचे छायाचित्र असावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.
त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेच्या माध्यमातून सर्व बीएलओंची बैठक बोलावून त्यांना उर्वरित मतदारांची छायाचित्रे संकलित करून मतदार यादी अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले. मतदार यादी भागातील ज्या मतदारांची छायाचित्रे नव्हती, अशा मतदारांचा बीएलओ यांनी शोध घेतला. त्यात काही मतदार स्थलांतरित, तर काही मृत झाल्याचे आढळून आले. त्यामुळे तलाठी, ग्रामसेवकांनी तसे पंचनामे करून अहवाल सादर केले. उर्वरित मतदारांची छायाचित्रे बीएलओंनी मतदार नोंदणी कार्यालय, सहायक मतदार नोंदणी कार्यालयाकडे जमा केले. गेल्या जानेवारीपासून ही कार्यवाही सुरू होती. ती जवळपास चार महिन्यांच्या परिश्रमानंतर एप्रिल २०२१ अखेर पूर्ण झाली.
मतदार यादीत सर्व छायाचित्रे संकलित करून निवडणूक शाखेने उत्कृष्ट आणि काैतुकास्पद कामगिरी बजावली आहे. मतदारांची छायाचित्रे संकलनासाठी बीएलओ, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी यांचे सहकार्य लाभले. आगामी काळात मतदानाविषयी अधिकाधिक जनजागृती करण्यात येईल. -संजय यादव, जिल्हा निवडणूक अधिकारी, धुळे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असतानाही धुळे जिल्ह्याने ही कामगिरी बजावली आहे. अशी कामगिरी करणारा धुळे जिल्हा हा नाशिक विभागात प्रथम, तर राज्यात कोल्हापूर, रत्नागिरीनंतर तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे. बीएलओ यांच्यासह सर्व टीमचे हे सामूहिक यश आहे. - प्रमोद भामरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी.