कोरोनामुळे यंदाही आरास नसल्याने विक्रेतेही फिरकले नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST2021-09-15T04:41:19+5:302021-09-15T04:41:19+5:30
जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या मानाने धुळे शहरात गणेशोत्सवाचा दरवर्षी अतिशय जल्लोष बघावयास मिळत असतो. शहरात मोठ्या सार्वजनिक मंडळांची संख्याही मोठी ...

कोरोनामुळे यंदाही आरास नसल्याने विक्रेतेही फिरकले नाहीत
जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या मानाने धुळे शहरात गणेशोत्सवाचा दरवर्षी अतिशय जल्लोष बघावयास मिळत असतो. शहरात मोठ्या सार्वजनिक मंडळांची संख्याही मोठी असून, यातील बहुतांश मंडळे ही सजीव देखावे व आरास सादर करीत असतात. स्थापनेच्या तीन-चार दिवसांनंतर भाविकही आरास बघण्यास घराबाहेर पडत असतात. सजीव आराशीचा देखावा हा साधारणत: १५ ते २० मिनिटांचा असतो. यातून विविध विषयांवर समाजप्रबोधन केले जाते. ही आरास बघण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. गर्दीमुळे गणेश मंडळ परिसरातील रस्ते गर्दीने रात्री उशिरापर्यंत फुलून गेलेले असतात. गणेशोत्सव म्हणजे छोट्या विक्रेत्यांसाठी व्यवसायाची पर्वणीच असते. मोठ्या मंडळांच्या लगतच पाणीपुरी, भेळ, चहा, याशिवाय विविध वस्तू विक्रीची दुकाने लावण्यात येत असतात. एकप्रकारे छोटेखानी यात्राच या मंडळांच्या परिसरात सायंकाळी सात ते १० या वेळेत भरलेली दिसून येत असते. भाविक आरास बघण्याबरोबरच ‘पोटपूजा’ही करीत असतात. तसेच लहान मुलांसाठी काही पालक खेळणी खरेदी करीत असतात. यातून किरकोळ विक्रेत्यांना किमान ५०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंतचा व्यवसाय एका दिवसात होत असतो. पाच-सहा दिवसात या विक्रेत्यांना बऱ्यापैकी कमाई होत असते.
मात्र यावर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. अगोदरच लॉकडाऊनमुळे किरकोळ वस्तू विक्रेत्यांवर मोठा परिणाम झालेला आहे. दोन-तीन महिने व्यवसायच नसल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात गणेशोत्सवात चांगला व्यवसाय होईल, पुन्हा सुगीचे दिवस येतील अशी अपेक्षा या विक्रेत्यांना होती. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने गणेशोत्सवासंबंधी बरेच निर्बंध घालून दिलेले आहेत. मूर्ती लहान, तसेच अगदी साधेपणाने उत्सव साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अनेक मंडळांनी यावर्षी शासन नियमांचे पालन करून, आरास करण्याचे टाळलेले आहे. यावर्षी सजीवसह इतर कुठलीच आरास नसल्याने, भाविकही फारसे घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे गर्दीच नसल्याने, विक्रेत्यांनीही मंडळ परिसरात दुकाने लावण्याचे टाळलेले आहे. त्यामुळे या उत्सवातून मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी फिरल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.