दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दाेन ठार, दहिवद आणि शिंदखेडानजीकची घटना

By देवेंद्र पाठक | Updated: May 6, 2023 18:21 IST2023-05-06T18:21:09+5:302023-05-06T18:21:34+5:30

दहिवद शिवारात झालेल्या अपघातात (आरजे ५२, जीए ८२५४) क्रमांकाच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने पुढे जात असलेल्या सायकलस्वाराला जोरदार धडक दिली.

two killed in two separate accidents, incident near Dahiwad and Shindkhed | दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दाेन ठार, दहिवद आणि शिंदखेडानजीकची घटना

दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दाेन ठार, दहिवद आणि शिंदखेडानजीकची घटना

धुळे : शिरपूर तालुक्यातील दहिवद आणि शिंदखेडानजीक झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

दहिवद शिवारात झालेल्या अपघातात (आरजे ५२, जीए ८२५४) क्रमांकाच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने पुढे जात असलेल्या सायकलस्वाराला जोरदार धडक दिली. यात हिरालाल बाबुलाल विश्वकर्मा (वय ६४, रा. दत्त टाॅकीजजवळ, शिरपूर) हे रस्त्यावर सायकलसह फेकले गेले. त्यांना डोक्याला आणि हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. अपघाताची ही घटना शिरपूर तालुक्यातील दहिवद गावाच्या शिवारात शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर तातडीने हिरालाल विश्वकर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी कंटेनर चालकाविरोधात शुक्रवारी सायंकाळी थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


शिंदखेडानजीकची घटना

शिंदखेडा ते दोंडाईचा रोडवर शिंदखेडापासून ३ किमी अंतरावर भरधाव वेगाने जात असलेली दुचाकी घसरली. यात गणेश मुरलीधर निकुम (वय २७, रा. ब्राह्मणपुरी, ता. शहादा, जि. नंदुरबार) हा तरुण रस्त्यावर फेकला गेला. त्याला डोक्याला मार लागला. ही घटना गुरुवारी घडली. गणेश निकुम याला तातडीने शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शुक्रवारी सकाळी सव्वाअकरा वाजता शिंदखेडा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. सहायक पोलिस उपनिरीक्षक जी. जे. ठाकरे घटनेचा तपास करत आहेत.

Web Title: two killed in two separate accidents, incident near Dahiwad and Shindkhed