मोटारसायकलीच्या डिक्कीतून पावणे दोन लाख लंपास; साक्री येथील घटना, गुन्हा दाखल
By देवेंद्र पाठक | Updated: September 26, 2023 18:33 IST2023-09-26T18:33:37+5:302023-09-26T18:33:49+5:30
साक्री शहरातील सुंदर सुपर मार्केटसमोर भररस्त्यात लावलेल्या मोटारसायकलीच्या डिक्कीतून १ लाख ७० हजार रुपये शिताफीने लांबविण्यात आले.

मोटारसायकलीच्या डिक्कीतून पावणे दोन लाख लंपास; साक्री येथील घटना, गुन्हा दाखल
धुळे : साक्री शहरातील सुंदर सुपर मार्केटसमोर भररस्त्यात लावलेल्या मोटारसायकलीच्या डिक्कीतून १ लाख ७० हजार रुपये शिताफीने लांबविण्यात आले. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, घटना लक्षात येताच सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून चोरट्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी तपास कामाला सुरुवात केली आहे. साक्री तालुक्यातील काशीपूर येथील शेतकरी जिभाऊ आबा मारनर (वय ५०) हे लाकडांचा व्यवसाय करतात. मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ते वंजारी गल्लीतील बँक ऑफ बडोदा शाखेत गेले होते. व्यापाऱ्यांना देण्यासाठी त्यांनी १ लाख ८० हजार रुपये बँकेतून काढले.
त्यातील १० हजाराची रोख रक्कम त्यांनी शर्टाच्या वरच्या खिशात ठेवली. उर्वरीत १ लाख ७० हजाराची रोकड ही एमएच १८ / ४९२८ क्रमांकाच्या दुचाकीच्या डिक्कीतील एका पिशवीत ठेवली. बसस्थानकाकडून जात असताना सुंदर सुपर मार्केटजवळ वाहतूक ठप्प झाल्याने ते थांबले होते. यावेळी गर्दीचा फायदा घेत एका पायी चालणाऱ्या चोरट्याने त्यांच्या डिक्कीतून पैशांची पिशवी शिताफिने गायब केली. चाेरीची ही घटना सकाळी साडेदहा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. थोड्या अंतरावर गेल्यानंतर डिक्कीतून पैसे लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. आणि पोलिसांनीही घटनेचे गांभिर्य ओळखून घटना घडली त्याठिकाणी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराची पाहणी केली असता त्यात चोरटा पैसे चोरताना दिसून आला आहे. पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.