अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार ठार, नरडाणा उड्डाणपुलावरील घटना, वाहन चालक फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 22:44 IST2023-03-24T22:44:27+5:302023-03-24T22:44:36+5:30
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे तरूण जागीच ठार झाले.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार ठार, नरडाणा उड्डाणपुलावरील घटना, वाहन चालक फरार
दत्तवायपूर (जि. धुळे) : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे तरूण जागीच ठार झाले. हा भीषण अपघात शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नरडाणा उड्डाणपुलावर झाला. अपघातानंतर चालक वाहनासह फरार झाला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे कामे सुरू होते.
राकेश प्रताप खैरनार (वय २६) व दीपक साहेबराव शिरसाठ (वय २१, दोन्ही रा. दत्तवायपूर,ता.शिंदखेडा) अशी मयत तरूणांची नावे आहेत.
राकेश व दीपक हे दोघे दुचाकीने नरडाणा येथे कामानिमित्त गेले होते. सायंकाळी घरी परतत असताना नरडाणा उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या घडकेत राकेश खैरनार हा दुचाकीवरून उड्डाणपुलाखाली फेकला गेला. तर दीपक रस्त्यावरच पडला होता.
१०८ रूग्णवाहिकेच्या साह्याने दोघांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता, डॅाक्टरांनी तपासून मयत घोषित केले. शनिवारी दोघांचे शवविच्छेदन करण्यात येईल. दोघ तरूणाच्या अपघाती मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दोघ अविवाहित
राकेश खैरनार याच्या पश्चात आई,वडिल भाऊ असा परिवार आहे. तर दीपक शिरसाठ याच्या पश्चात आई,वडील, चार बहिणी आहेत. तो घरातील एकुलता एक होता. दोघेही अविवाहित होते.