चिकसे येथे पाण्यात वाहून गेल्याने महिलेचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 22:11 IST2019-08-02T22:10:49+5:302019-08-02T22:11:20+5:30
शुक्रवारी पहाटेचा थरार : व्यक्त होतेय हळहळ

चिकसे येथे पाण्यात वाहून गेल्याने महिलेचा करुण अंत
धुळे : साक्री तालुक्यातील चिकसे येथील कमलबाई संपत महाले या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला़ यामुळे चिकसे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कमलबाई संपत महाले (७५) या शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास शौचालयासाठी गेले असता अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढली़ परिणामी कमलबाई या पाण्यात वाहून गेल्याची घटना येथे घडली आहे़ तर त्यांचा मृतदेह हा पाचशे मीटर अंतरापर्यंत वाहून गेल्यानंतर मिळून आला़ अचानक घडलेल्या या घटनेमुळे चिकसे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दररोज होत असलेल्या संततधार पावसामुळे विरखेल धरण भरल्याने गटखळ नदीला पाणी वाढले आहे़ कमलबाई या शौचालयास गेले असता वयाने त्या वृद्ध असल्याने अचानक वाढलेल्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे मृत शरीर हे पाचशे मीटर दूर अंतरावर मिळून आले़ सकाळी ही बाब घरच्यांना समजताच गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. कमलबाई यांचे शवविच्छेदन पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले़ घटनेचा पंचनामा तलाठी ग्रामसेवक यांनी केला आहे़ तर, पिंपळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.