डेरगं भरण्याची परंपरा आजही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:35 IST2021-05-16T04:35:04+5:302021-05-16T04:35:04+5:30
अक्षय तृतीया या दिवशी हा कौटुंबिक कार्यक्रम पार पडत असून ग्रामीण भागात ही परंपरा आजही कायम असल्याचे चित्र दिसून ...

डेरगं भरण्याची परंपरा आजही कायम
अक्षय तृतीया या दिवशी हा कौटुंबिक कार्यक्रम पार पडत असून ग्रामीण भागात ही परंपरा आजही कायम असल्याचे चित्र दिसून आले. अक्षय तृतीया या सणाला ग्रामीण भागात आखाजी म्हणून संबोधतात, तर यानंतर येणारा दिवस म्हणजे ताडापुरण म्हणून ओळखला जातो. या दोन्ही दिवसांचे महत्त्व ग्रामीण भागात आजही आबाधित असून रूढी-परंपरा कायम असल्याचे दिसून आले. अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून ओळखला जातो. तृतीया व पाडवा या दोन्ही दिवसांना खेडोपाडी आजही विशेष महत्त्व असल्याचे दिसून येते.
अक्षय तृतीया म्हणजे आखाजी. या दिवशी कुटुंबातील किंवा भाऊबंदकीमधील जो कोणी सदस्य याआधी मृत्यू पावला असेल तर त्या विवाहित सदस्याच्या नावाने हा डेरगं भरण्याचा विधी पार पडत असतो.
लाल रंगाचे मातीचे कोरे मडके, आजतरी त्याला मडके म्हणत नाहीत. स्वर्गीय माता म्हणून लाल रंगाचे केळी व स्वर्गीय पिता म्हणून काळ्या रंगाचे करा म्हणून या मडक्यांना नावे आहेत. त्यावर लोटा ठेवून पुरणपोळी आमरसाचा नैवेद्य ठेवला जातो. कुटुंबातील ज्या सदस्याच्या नावे हा कार्यक्रम असतो त्याच्या घराच्या माजघरात हा कार्यक्रम पार पडत असून कुटुंबातील सर्व उपस्थित सदस्य तसेच जवळील नातेवाईक यामध्ये तांब्या भरून पाणी टाकत असतात तर भाऊबंदकीचे सदस्य नैवेद्यासह आपापल्या घरून पाणी आणून त्यामध्ये टाकत असतात. आजही कुटुंबात हा विधी झाल्याशिवाय लग्न किंवा कोणतेही शुभ काम करत नाहीत. यामुळे एकत्रित कुटुंब पद्धतीला वाव मिळत असून या कार्यक्रमाला कुटुंबातील सर्वच सदस्य आवर्जून हजर राहत असतात.