ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:57 IST2020-08-10T12:57:22+5:302020-08-10T12:57:44+5:30
विंचूरजवळील घटना : ट्रक चालकाविरुध्द गुन्हा

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू
धुळे : चाळीसगावहून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली़ यात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला़ ही घटना धुळे तालुक्यातील विंचूर गावाजवळ रविवारी सायंकाळी उशिरा घडली़
एमएपी ४६ एमबी ८९७२ क्रमांकाच्या दुचाकीवरुन तीन तरुण चाळीसगावहून धुळेमार्गे सेंधवा गावाकडे काम शोधून पुन्हा घराकडे जात होते़ धुळे तालुक्यातील विंचूर गावाजवळ चाळीसगावच्या दिशेने जाणारा टीएन १८ एपी ७९२० क्रमांकाचा चौदा चाकी ट्रक जात होता़ या ट्रकची जोरदार धडक दुचाकीला बसली़ या दुर्घटनेत मध्यप्रदेशातील पेवा नानला चौहान (२८), श्यामलाल बरकत खरते (३०) (दोन्ही रा़ शिवन्या ता़ सेंधवा जि़ बडवानी) आणि कानसिंग कसा रावत (१९) रा़ भामपुरा ता़ सेंधवा जि़ बडवानी हे गंभीर दुखापती झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ दुचाकीचाही चेंधामेंधा झाला़ अपघाताची ही घटना रविवारी सायंकाळी उशिराने विंचूर पुलावर घडली़
अपघात होताच मोठ्या प्रमाणावर आवाज झाल्याने विंचूर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याला सुरुवात केली़ गंभीर जखमी असलेल्या तिघांना तातडीने रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़ तसेच अपघाताची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे आणि धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती़ याप्रकरणी बरकत जिरला खरते (५३, रा़ शिवन्या, ता़ सेंधवा जि़ बडवानी) यांनी सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे़