विलगीकरण कक्षाचा उपयोगच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 14:59 IST2020-08-08T14:58:55+5:302020-08-08T14:59:09+5:30
पिंपळनेर : कोरोना संशयित रूग्णांवर उपचार करण्याऐवजी धुळे, साक्रीला जाण्याचा दिला जातो सल्ला

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : कोरोनाबाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील ग्रामीण रूग्णालयात विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेले आहे. मात्र संशयित रूग्ण याठिकाणी आल्यास या रूग्णलायातर्फे रूग्णाला धुळे अथवा साक्रीला जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यामुळे या विलगीकरण कक्षाचा उपयोगच होत नाही अशी तक्रार आहे. या संदर्भात आज भाजपतर्फे ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देवून रूग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
देशासह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सुरवातीचे काही दिवस पिंपळनेर शहर कोरोनामुक्त होते. मात्र आता याठिकाणीही बाधित रूग्णांची संख्या आतापर्यंत ६५ झालेली असून, यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. कोरोना संशयितांवर उपचार व्हावेत यासाठी येथील ग्रामीण रूग्णालायात पाच खाटांचे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. मात्र या विलगीकरण कक्षात कुठल्याही प्रकारचा उपचार केला जात नसल्याची तक्रार आहे.
पिंपळनेर शहर व परिसरातील रुग्णांना काही लक्षणे आढळून आल्यास किंवा इतर काही त्रास होत असल्यास प्रशासनाने सांगितल्यानुसार ते पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी येतात. ग्रामीण रुग्णालयात नावालच रूग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना धुळे येथील जिल्हा रुग्णालयात अथवा साक्री येथे जाण्यास सांगण्यात येते. संशयित रुग्ण धुळे येथे गेल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला काहीही झालेले नाही. साक्री, येथे जाऊन अगोदर स्वॅब देण्यास सांगितले जाते व परत घरी पाठवून दिले जाते.यात रूग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत असते. रूग्णांना विलगीकरण कक्षात योग्य उपचार करण्यात यावेत अशी अपेक्षा शहरवासियांनी केलेली आहे.