यापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होत होते. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्याचा निर्णय झाला. त्यामुळे निवडणुका झाल्या तरी आरक्षण कोणत्या प्रवर्गाचे निघेल याची कोणालाही शाश्वती नव्हती.
धुळे जिल्ह्यात सर्वच गावांचे सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. सोमवारी महिला सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. मात्र धुळे तालुक्यातील सावळी-सावळीतांडा व शिरधाने प्र.नेर या दोन गावांचे अनुसूचित जमाती महिला सरपंचपदाचे आरक्षण निघालेले आहे. मात्र या दोन्ही गावात या प्रवर्गातील महिला ग्रामपंचायत सदस्य नसल्याने पेच निर्माण झालेला आहे.
पुढे काय होणार?
ज्या गावांमध्ये संबंधित प्रवर्गाचे आरक्षण निघाले, मात्र त्या प्रवर्गातील सदस्यच निवडून आलेला नसल्यास तहसीलदार तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील. नंतर जिल्हाधिकारी निर्णय घेतील.
बहुमत नसतांनाही लॅाटरी
दरम्यान काही गावांमध्ये पॅनलला बहुमत मिळालेले नाही. मात्र ज्या प्रवर्गाचे आरक्षण निघाले आहे, त्या प्रवर्गातील सदस्य असल्याने अशा सदस्यांची ऐनवेळी लॅाटरी लागल्याचेही चित्र आहे.