विद्यमान सरपंच साहेबराव पवारांसह दिनेश ठाकरेंच्या पत्नी विजयी*
दोंडाईचा : तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची आणि सर्व राजकीय मंडळींचे लक्ष लागून असलेल्या कर्ले ग्रामपंचायतमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलने सलग तिसऱ्यांदा दणदणीत विजय मिळविला असून एकू११ पैकी ९ जागा भाजप तर महाविकास आघाडी पॅनेलला केवळ २ जागा मिळाल्या आहेत. गेल्या वेळी भाजपचे पॅनेल प्रमुख प. स. सदस्य दगाजी देवरे यांच्या पॅनेलला ८ जागा मिळाल्या होत्या, त्यात १ जागेची वाढ झाली असून विरोधी पॅनेलचे प्रमुख मनोहर देवरे व नारायण चव्हाण यांना गेल्या वेळी मिळालेल्या ३ जागांमध्ये १ जागेची घट झाली आहे. यात विद्यमान सरपंच साहेबराव पवार यांच्या पत्नी रेखाबाई साहेबराव पवार, आमदार जयकुमार रावल यांचे स्वीय सहायक दिनेश ठाकरे यांच्या पत्नी सीमा दिनेश ठाकरे, माजी सरपंच राजसबाई बेडसे यांचे सुपुत्र गोकुळ बेडसे आदी प्रमुख मान्यवरांनी दणदणीत विजय मिळविला
वॉर्ड क्र १ मध्ये दिनेश बाळू देवरे व योगिता समाधान शेवाळे या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला. वॉर्ड क्र २ मध्ये विद्यमान सरपंच साहेबराव पवार यांच्या पत्नी रेखाबाई पवार, नानाभाऊ ठाकरे, इंदूबाई भिल या भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली. वॉर्ड क्र ३ मध्ये माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांचे पी. ए. दिनेश ठाकरे यांच्या पत्नी सीमा दिनेश ठाकरे, पंडित वाघ आणि सरलाबाई सोनवणे यांनी दणदणीत विजय मिळविला. वॉर्ड क्र ३ मध्ये सर्व उमेदवार २०० पेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. विरोधी पॅनेल केवळ जेमतेम १०० च्या पुढे मते मिळाली. वॉर्ड क्र ४ मध्ये अतिशय लक्षवेधी लढत होती. यात हटकर समाजच्या जण्याबाई रमेश मोरे यांनी मीना विजय देवरे यांचा पराभव केला, माजी सरपंच राजसबाई बेडसे यांचे पुत्र गोकुळ बेडसे आणि संगीताबाई विठ्ठल चव्हाण यांनी विजय मिळविला.
एकूणच कर्ले ग्रामपंचायतमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्यात माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांच्या गटाला यश आले आहे.