सोनगीर : धुळे तालुक्यातील बुरझड येथील बेपत्ता १९ वर्षीय युवतीचा विहिरीत मृतदेह आढळून आला़ या मागे घातपाताचा संशय असल्याची गावात चर्चा सुरु आहे़ या प्रकरणी सोनगीर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.धुळे तालुक्यातील बुरझड येथील अक्काबाई न्हानु ठेलारी ( वय १९) ही युवती बुरझड येथून १९ तारखेला बेपत्ता झाली होती. यानंतर २० रोजी दशरथ विठोबा कोळपे यांनी सोनगीर पोलिसात युवती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पण सदर युवती २१ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास बुरझड गावाच्या शिवारातील शामराव आत्माराम पाटील यांच्या शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे.घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान युवतीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला होता़ तेव्हा नातेवाईकांनी रुग्णालय व पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती़ याप्रसंगी नातेवाईक सदर युवतीचा घातपात झाल्याचा आरोप करीत होते. युवतीचे येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर देखील प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी म्हणून युवतीचे पार्थिव धुळे येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात घेऊन जात पुन्हा शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला़ दरम्यान दुपारी उशिरापर्यंत सोनगीर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद होती.धुळे तालुक्यातील बुरझड गावात या घटनेची जोरदार चर्चा सुरु झाली आहे़ नेमकी या घटनेमागे घातपात आहे की नाही याची देखील शहानिशा सोनगीर पोलिसांकडून केली जात आहे़ सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन योग्य पध्दतीने होणार नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केल्यामुळे मयत युवतीचा मृतदेह धुळ्यात शवविच्छेदन करण्यासाठी सायंकाळी आणला जाणार आहे़ सोनगीर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर तपास कामाला सुरुवात करण्यात आली आहे़सोनगीर येथील रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर पुन्हा धुळे येथील रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर अगोदर आरोपींना अटक करून कारवाई करावी अशी मागणी युवतीच्या नातेवाईकांनी लावून धरली होती़दोषींविरुध्द गुन्हे दाखल करणारगुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी लावून धरली होती़ दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील व नातेवाईकांमध्ये चर्चा झाल्यानंतर या प्रकरणातील जे कोणी दोषी असतील त्यांच्या कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती युवतीच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली़ त्यानंतरच सायंकाळी उशिरा मृतदेह ताब्यात घेऊन बुरझड गावी युवतीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘त्या’ युवतीच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 22:04 IST