कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती सादर करा : जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:38 IST2021-05-21T04:38:01+5:302021-05-21T04:38:01+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी ‘कोविड-१९’ दरम्यान दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या काळजीसाठी गठित जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक झाली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक ...

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती सादर करा : जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी ‘कोविड-१९’ दरम्यान दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या काळजीसाठी गठित जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक झाली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी शिरसाट, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हेमंतराव भदाणे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी चव्हाण, बालविकास अधिकारी एम. एम. बागूल, निरीक्षणगृहाच्या अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. अमित दुसाने आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या बाल समितीच्या निर्देशानुसार ‘कोविड १९’ प्रादुर्भावाच्या काळात बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देत त्यांच्या संगोपनासाठी उपाययोजना व्हाव्यात, म्हणून कृती दल गठित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांत चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या क्रमांकाचा फलक दर्शनी भागात प्रदर्शित करावा. महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत बालगृहे, निरीक्षणगृहातील मुलांसाठी तात्काळ स्वतंत्र वैद्यकीय पथक गठित करावे. या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना पोलीस दलाने सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करून द्यावे. अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार, तस्करीसारख्या गुन्हेगारीत सापडणार नाहीत, याचीही दक्षता पोलीस दलाने घ्यावयाची आहे. कोरोना आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकास बाल संगोपन योजनेंतर्गत लाभ देत बालकाचा ताबा नातेवाईकांकडे देण्याच्या शक्यतेबाबत पडताळणी जिल्हा बालकल्याण समितीने करावी. तसेच कृती दलाची बैठक दर पंधरा दिवसांनी आयोजित करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
यावेळी बालगृहांचा आढावा घेतला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी भदाणे यांनी, कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना काही समस्या असल्यास त्यांनी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८, ८३०८९-९२२२२ (सकाळी ८ ते रात्री ८) येथे किंवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, धुळे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, ५२, जयहिंद कॉलनी, सुधा हॉस्पिटलसमोर, देवपूर, धुळे, अध्यक्ष, सदस्य, बालकल्याण समिती, धुळे, मुलांचे निरीक्षणगृह, बालगृह, साक्री रोड, धुळे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.