जिल्ह्यात काही दिवसांपासून पाऊस होत असला तरी अद्यापही लघु व मध्यम प्रकल्पांत अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. सद्य:स्थितीत प्रकल्पांमध्ये केवळ ५० टक्के पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील ४७ लघु प्रकल्पांपैकी आतापर्यंत केवळ १२ प्रकल्प भरले आहेत. गेल्या वर्षी याच काळात ३९ लघु प्रकल्प भरले होते. जिल्ह्यात काही भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला.
आतापर्यंत सर्वाधिक पाऊस धुळे तालुक्यात १४०.६ टक्के झाला आहे. साक्री तालुक्यात ११७.४ टक्के, शिरपूर तालुक्यात ७०, तर शिंदखेडा तालुक्यात ८८ टक्के पाऊस झाला आहे. मध्यम व लघु प्रकल्पात पुरेसा जलसाठा झालेला नाही.
गेल्या वर्षी याच काळात १२ मध्यम प्रकल्पांत ७६.४४ टक्के जलसाठा होता. यंदा तो ५१.७७ टक्के आहे. जामखेडी आणि कनोली हे दोन प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. लाटीपाडा प्रकल्पात १०० टक्के, मालनगाव प्रकल्पात ९४.३५ टक्के, बुराई प्रकल्पात ५२ टक्के, करवंदमध्ये ८६.४० टक्के, अनेरमध्ये ७६.७३ टक्के, सोनवदमध्ये २०.३३ टक्के, अक्कल पाडात ४६.२४ टक्के, वाडीशेवाडीत ३२.५२ टक्के, अमरावतीत २८.६६ टक्के, सुलवाडेत ३०.६३ टक्के जलसाठा आहे.