जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आजारी : २९९ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:31 IST2021-02-08T04:31:32+5:302021-02-08T04:31:32+5:30
कोरोना काळातही अपुऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसमवेतच आरोग्य यंत्रणा काम करत होती. आरोग्य केंद्र, उपकेंद्रासोबतच ग्रामीण रुग्णालयातील पदे रिक्त आहेत. कोरोना ...

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आजारी : २९९ पदे रिक्त
कोरोना काळातही अपुऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसमवेतच आरोग्य यंत्रणा काम करत होती. आरोग्य केंद्र, उपकेंद्रासोबतच ग्रामीण रुग्णालयातील पदे रिक्त आहेत. कोरोना काळात आरोग्य यंत्रणेने चांगले कार्य केले. बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करणे तसेच सर्वेक्षण मोहीम राबवण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी केले. रिक्त जागांमुळे सर्वेक्षण मोहीम व कोरोनासंबंधी इतर कामे करताना अतिरिक्त ताण सोसावा लागला होता. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील गट क चे एकूण ७८९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४९० पदे भरली गेली आहेत. तर २९९ पदे अद्याप रिक्त आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये रिक्त पदे भरण्याबाबत राज्य शासनाने सूचना केली होती. रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक असलेली बिंदुनामावली मात्र अजूनही प्राप्त झालेली नाही. बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
डॉक्टरच नाहीत -
जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्य यंत्रणेत डॉक्टरांची पदेही रिक्त आहेत. ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील डॉक्टरांची ८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. शासनाच्या विविध मोहीम, सर्वेक्षण नेहमी सुरू असतात. रिक्त पदे भरले तर आरोग्य क्षेत्रातील विविध मोहिमा प्रभावीपणे पार पडतील.
बिंदुनामावलीनंतर होईल भरती -
ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील क गटातील २९९ पदे रिक्त आहेत. त्यात सरळसेवा व पदोन्नतीच्या पदांचा समावेश आहे. बिंदुनामावलीची यादी अद्याप शासनाकडून प्राप्त झालेली नाही. बिंदुनामावलीची यादी प्राप्त झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरुवात होईल. येत्या आठवड्यात बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.
- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी
आकडेवारी अशी -
प्राथमिक आरोग्य केंद्र - ४१
आरोग्य उपकेंद्र - २३२
एकूण कर्मचारी -
आरोग्य केंद्रे - ३००
आरोग्य उपकेंद्रे - ४८९
रिक्त कर्मचारी -
आरोग्य केंद्रे - १८६
उपकेंद्र - ११३