नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिला जातोय आकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 11:43 IST2020-01-13T11:42:57+5:302020-01-13T11:43:20+5:30

नावारूपाला आलेली वसमाने येथील शाळा

Shape is being given to the future of students by implementing innovative activities | नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिला जातोय आकार

नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिला जातोय आकार

आॅनलाइन लोकमत
भिका पाटील
शिंदखेडा : नेहमीच नवनवीन उपक्रम राबवून तालुक्यातील वसमाने येथील जिल्हा परिषद शाळा नावारूपाला आलेली आहे. आदर्श विद्यार्थी घडविण्याबरोबरच त्यांच्या भवितव्याला आकार देण्यासाठी शाळेतील सर्वच शिक्षक प्रयत्नशील असतात. त्यामुळे शाळेचा निकालही दरवर्षी चांगला लागत असतो.
अवघ्या ४५० लोकसंख्या असलेल्या वसमाने गावाची जिल्हा परिषद शाळा कुरकवाडे केंद्रांतर्गत येते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील इंग्रजी विषयाची भीती नाहिशी होऊन या विषयाबद्दल त्यांच्यात आवड निर्माण व्हावी यासाठी शिक्षकांमार्फत प्रयत्न केले जातात. त्याचप्रमाणे ज्या दिवशी जी तारीख असेल त्याचे पाढे म्हटले जातात. यात विद्यार्थ्यांचे पाढे तर पाठ होतातच, पण त्यांच्या गणित विषयाचा पायाही पक्का होण्यास मदत मिळत असते.
पहिली ते चौथीपर्यंत असलेल्या या शाळेची पटसंख्या अवघी नऊ होती. मात्र शाळेतील शिक्षकांनी पालकांशी संपर्क साधून शाळेविषयी, शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयी पालकांना माहिती दिली. त्यामुळे शाळेची पटसंख्या वाढली.
शाळेत मुख्याध्यापकासह एक शिक्षक कार्यरत आहे. दर महिन्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचीही उपस्थिती १०० टक्के असते.
शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने परसबाग फुलवली आहे.ताजा भाजीपाला शाळेतच मिळत असल्याने विद्यार्थ्यांना रोज सकस आहार मिळत असतो. शाळा सुधारण्याचा पहिला उपक्रम राबविला तो वृक्षारोपणाचा. कारण शालेय परिसर हिरवागार असेल तर विद्यार्थ्यांचे मन अध्यापनात लागत असते. शाळा परिसरात जवळपास ४० वृक्ष लावण्यात आली आहे. या झाडांच्या सावलीत बसून विद्यार्थी अभ्यास करीत असतात.
पालकांना दिली जाते माहिती
शाळेत विद्यार्थ्यांना काय शिकविले जाते, विद्यार्थ्याची प्रगती कशी आहे, याची माहिती पालकांच्या सभा घेऊन दिली जाते. त्यामुळे पाल्याची प्रगती पालकांना कळत असते.

Web Title: Shape is being given to the future of students by implementing innovative activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे