स्कोअर २२... प्रकृती गंभीर... तरीही कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:39 IST2021-05-20T04:39:06+5:302021-05-20T04:39:06+5:30
पश्चिम बंगाल येथील ३५ वर्षीय शिवकुमार लक्ष्मण घोष हा नोकरीनिमित्त टिकरी ता़सेंधवा जि़बडवानी येथे परिवारासह आला होता. ...

स्कोअर २२... प्रकृती गंभीर... तरीही कोरोनावर मात
पश्चिम बंगाल येथील ३५ वर्षीय शिवकुमार लक्ष्मण घोष हा नोकरीनिमित्त टिकरी ता़सेंधवा जि़बडवानी येथे परिवारासह आला होता. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात शिवकुमार यास कोरोनाचा संसर्ग झाला. त्यास त्याच्या पत्नीने स्थानिक रुग्णालयात देखील उपचारासाठी दाखल केले. श्वास घ्यायला अधिक त्रास होऊ लागला. मात्र, तेथे ऑक्सिजनयुक्त बेड मिळत नव्हते. तशातच त्याची प्रकृती खालावली़. अखेर त्याने पत्नी व मुलीसह शिरपूर गाठले. तो उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला. त्यावेळी त्याचा सीटी स्कोअर केवळ २२ होता. ऑक्सिजन लेव्हल ६० टक्के होती. प्रकृती गंभीर होती. त्याची ३० वर्षीय पत्नी कोमल व एक ८ वर्षाचा चिमुकला मुलगा होता. सोबत नातेवाईक नाही, जवळचे मित्र नाहीत, त्या महिलेला येथील परिसर नवीऩ होता. परंतु तिने डॉक्टरांवर विश्वास ठेवून उपचारासाठी याचना केली.
प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला लागलीच येथील रुग्णालय प्रशासनाने ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध करून औषधोपचार सुरू केले. सर्व घडामोडी घडत असताना तो तरुण मात्र निर्धास्त होता. मला काहीही होणार नाही, मी आजाराला घाबरत नाही, डॉक्टर तुम्ही उपचार करा, असे सांगणारे शिवकुमार हे १९व्या दिवशी ठणठणीत बरे झाले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. धुरवराज वाघ, डॉ़. प्रसेनजीत धवले, डॉ़. नितीन निकम, डॉ़. मोहज्जम खान, डॉ़. हिरेन पवार, डॉ़. अमोल जैन, डॉ़. योगेश अहिरे, डॉ़. महेंद्र साळुंखे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे त्याने कोरोनावर मात केली.
बाधित शिवकुमार यास येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती महिला व तिचा मुलगा मात्र हॉस्पिटलच्या परिसरात तळ ठोकून राहात होते. त्यांचे जेवणाचे हाल झाले. मात्र, रुग्णालय प्रशासनाला समजल्यावर त्या दोघांचीदेखील जेवणाची सुविधा करण्यात आली. कुणीही नातेवाईक नसताना केवळ डॉक्टरांवर विश्वास ठेवून होते. सुदैवाने ते दोघेही निगेटिव्ह राहिलेत. येथील डॉक्टरांनी जो मानसिक आधार दिला तोसुध्दा लाख मोलाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
मी कोरोनाची भीती बाळगली नाही. योग्य आहार घेतला. काय होणार नाही, हा विश्वास होता. जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती व उर्मी होती. त्यामुळे कोरोनाला हरवून जीवन पुन्हा जगण्याची संधी मिळाली.
-शिवकुमार घोष
खरे तर शिवकुमार यांची प्रकृती चिंताजनक होती. २० सीटी स्कोअर व ऑक्सिजनची पातळीदेखील खोल गेली होती. यामुळे रुग्ण जगतोय की नाही, याची शाश्वती देता येत नव्हती. मात्र, त्याच्याकडे जीवन जगण्याची प्रेरणा, आत्मविश्वास, संकटाला सामोरे जाण्याची वृत्ती, भीती न बाळगणे आदी गुणांमुळे त्याने कोरोनावर मात केली. डॉक्टरांनीदेखील शर्तीचे प्रयत्न करून त्यांचे पालकत्व स्वीकारले.
-डॉ. धुरवराज वाघ,
वैद्यकीय अधीक्षक, शिरपूर