स्कूल बस चालकांना १४ महिन्यांपासून नाही काम;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:39 IST2021-05-20T04:39:18+5:302021-05-20T04:39:18+5:30
धुळे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे स्कूल बस चालकांना गेल्या १४ महिन्यांपासून काम नसल्याचे चित्र ...

स्कूल बस चालकांना १४ महिन्यांपासून नाही काम;
धुळे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे स्कूल बस चालकांना गेल्या १४ महिन्यांपासून काम नसल्याचे चित्र आहे. रोजगार पूर्णपणे बुडाल्याने काही चालक भाजीपाला विकून, तर काही रोजंदारीने कामाला जाऊन आपला उदरनिर्वाह भागवत आहेत.
मागील वर्षी देशभरात कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्यानंतर लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यामुळे शाळांनाही टाळे लागले आहे. त्यानंतर निर्बंध शिथिलही झाले होते. मात्र, शाळा काही उघडल्या नाहीत. शाळा उघडण्याचा निर्णय घेतला तोपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने शाळा बंद झाल्या व निर्बंधही कडक करण्यात आले. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. त्याचप्रकारचे हाल स्कूल बस चालकांनाही सोसावे लागत आहेत. तसेच आणखी पुढील काही महिने शाळा उघडण्याची शक्यता नाही. त्यामुळे शहरातील अनेक स्कूल बस चालकांनी पर्यायी रोजगार शोधायला सुरुवात केली आहे. काहीजण आपल्या वाहनांचा वापर करून भाजीपाला विक्री करत आहेत, तर काहीजण औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये रोजंदारीने कामाला जात आहेत. शासनाने मदत करावी अशी अपेक्षा अडचणीत सापडलेल्या स्कूल बस चालकांनी केली आहे.
व्यवसाय ठप्प झाला -
रिक्षाच्या माध्यमातून शाळेतील लहान मुलांची ने - आण करायचो. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने रोजगार बुडाला आहे. मागचे पूर्ण वर्ष लॉकडाऊनमध्ये गेले. यावर्षी शाळा सुरू होतील असे वाटले होते; पण शाळा सुरू न झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. रोजगार गेल्यामुळे अडचणीत सापडलो आहे.
- गोपाळ वाघ, धुळे
कर्मचाऱ्यांची ने - आण
दत्तमंदिर परिसरातून चावरा शाळेत टाटा माझिक गाडीच्या माध्यमातून मुलांची ने - आण करायचो. मागील १५ वर्षांपासून हे काम करीत होतो; पण शाळा बंद झाल्यापासून खासगी कपंनीतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करत आहे. पण कमी कर्मचारी नेऊ शकत असल्याने परवडत नाही. शासनाने मदत करावी.
- राजू माळी, धुळे
खासगी वाहतूक -
शहरातील खासगी शाळांमध्ये मुलांना रिक्षातून सोडत होतो; पण शाळा बंद झाल्यामुळे शहरात प्रवाशांची वाहतूक करतो. पण लॉकडाऊन असल्याने प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. तसेच ११ वाजेपर्यंतच परवानगी आहे. रिक्षा चालकांसाठी परवानगी शिथिल करून दिवसभर रिक्षा चालवण्याची परवानगी द्यावी.
- मधुकर वाघ, धुळे
खारी, टोस्टची विक्री -
मागच्या १८ वर्षांपासून शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करत होतो; पण शाळा बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे रिक्षामधून खारी, टोस्ट विक्री करतो आहे. शहरातील विविध कॉलन्यांमध्ये रिक्षाचा उपयोग करून घरपोहोच खारी, टोस्टची विक्री करीत आहे.
- विलास निकम, धुळे
कंपनीत रोजंदारीवर रिक्षा -
शाळा बंद झाल्याने रिक्षा एकाच जागेवर थांबून होती. खासगी वाहतूक करायची म्हटली तरी प्रवासी मिळत नव्हते. त्यामुळे एमआयडीसीमधील खासगी कंपनीत रिक्षा रोजंदारीवर लावली आहे. रिक्षा उभी होती तरी इन्शुरन्स भरत होतो. स्कूल बस चालकांना शासनाने मदत केली पाहिजे.
- अनंत महाले, धुळे
मागण्या काय -
शाळा बंद असल्यामुळे रोजगार बुडाला आहे. अनेक स्कूल बस चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक स्वरूपाची मदत करावी, अशी मागणी चालकांनी केली आहे. तसेच खासगी वाहतूक करीत असलेल्या चालकांना प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे नियम शिथिल करून दिवसभर वाहतुकीची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुले दररोज स्कूल बसने प्रवास करायचे - ६८००
शहरातील एकूण बस - १६०
शहरातील एकूण चालक - १८०