साक्रीचे कलिंगड जातात थेट विदेशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 10:32 PM2019-12-14T22:32:46+5:302019-12-14T22:33:15+5:30

उच्च शिक्षण तरीही शेतीकडे ओढा । इतरांनीही घ्यायला हवी प्रेरणा, विकास साधावा : दीपक काकुस्ते

Sakri's Kalingad goes abroad directly | साक्रीचे कलिंगड जातात थेट विदेशात

साक्रीचे कलिंगड जातात थेट विदेशात

googlenewsNext

संडे हटके
धुळे : साक्री तालुक्यातील शेणपूर सारख्या छोट्याशा गावातील दीपक हरि काकुस्ते यांनी उच्च शिक्षण घेतले़ पण, शेतीत आवड आणि काहीतरी वेगळे करण्याची त्यांची जिद्द त्यांना शांत बसू देत नव्हती़ त्यांनी शेतीकडे आपला कल वळविला़ त्यात त्यांनी कलिंगडाची शेती सुरु केली़ त्यांचे कलिंगड देशातच नाहीतर आजच्या स्थितीत विदेशात जात आहेत़
दिपक हरी काकूस्ते, गाव शेणपूर, ता साक्री, जि धुळे. शिक्षण एमए, एमफील, बीएड (अर्थशास्त्र). उच्च शिक्षण घेऊनही शेतीची आवड असल्याने प्राध्यापकाची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. अर्थशास्त्रात संशोधन करत असतानाच ‘बदलती पीकपद्धती आणि शेतीचा विकास’ या विषयावर संशोधन केले. त्यानंतर धुळे येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयात व्याख्याता म्हणून नोकरी केली. शेतीची आवड असल्याने ओढ मात्र तिकडेच होती. त्यामुळेच २००७ साली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला व फळबाग शेतीकडे वळालो. शेतीत मोठे वडील हरी राजाराम काकूस्ते व मोठे भाऊ नंदकुमार हरी काकूस्ते यांचीही मोलाची मदत असल्याने व शेतीची पार्श्वभूमी असल्याने निर्णय घेणे अजून सोपं झाले.
त्यानंतर डाळिंब, पपई, इत्यादी फाळपिके घेतली व भरगोस उत्पादन मिळवले. दरम्यानच्या काळात शेती क्षेत्र वाढवत ते १८ एकर वरुन ५३ एकरवर आणले़ कालांतराने मृदा व जल प्रदूषण समस्या गंभीर होत चालली असतांना पीक पद्धतीत बदल करत नवनवीन प्रयोग सुरु केलेत़ त्यात अल्पावधीत येणार पीक म्हणून कलिंगड लागवड करण्याचा निर्णय घेतला. तसेच डाळिंबावरील रोगांचा प्रादुर्भाव बघता पेरुची लागवड केली. गेल्या तीन वर्षांपासून कलिंगडाची यशस्वीरित्या उत्पादन घेत आहे व त्याला योग्य वेळेनुसार लागवड करुन बाजारात चांगले दरही मिळत आहेत.
यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे कलिंगड लागवड होईल की नाही याची शाश्वती नसतांना नियोजनपूर्वक रोपांची लागवड पॉलिहाऊसमध्ये केली़ व २४ सप्टेंबर रोजी पुनर्लागवड केली. त्यानंतरही संपूर्ण आॅक्टोबर व नोव्हेंबरचे काही दिवस पाऊस कोसळत असताना वेलांची वाढ अमर्याद होत असताना वेलांची वाढ थांबवण्यात यश आले़ फळधारणा करु शकलो. त्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे मधमाश्यांची प्रचंड कमी जाणवली़ त्यामुळे, फळधारणा होण्यास अडचणी आल्यात. माल तयार झाल्यावर उत्तर भारतात मालाची असलेली मागणी व पुरवठ्याचा तुटवडा बघता कलिंगडाला आजपर्यंतचा सर्वोच्च भाव म्हणजे प्रतिकिलो २२ रुपये ५० पैसे या भावाने माल विक्री जागेवर केली. दिनांक ५ व ६ डिसेंबर रोजी मालाची काढणी केली. साडेचार एकरात ६३ टन माल निघाला व दुसऱ्या टप्प्यात उर्वरित अडीच एकर क्षेत्रात साधारण ३५ टन माल निघेल असा अंदाज आहे. आशा प्रकारे साधारणपणे सात एकर क्षेत्रात १७ ते १९ लाखांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे़ त्यात साधारण खर्च हा ६ लाख रुपये असेल, असा अंदाज आहे़ म्हणजे निव्वळ नफा ११ ते १३ लाख मिळेल, असा विश्वास आहे़ अश्या पद्धतीने सगळ्यांनी जर नियोजनबद्ध शेती केल्यास नक्की यश मिळेल असा मला असल्याचे काकुस्ते म्हणतात़
शेतीतून विकास साधता येऊ शकतो
दीपक यांनी आपल्या शेतात बाहुबली वाणाची लागवड केली आहे़ उत्तम असे हे वाण असल्यामुळे त्यांच्या कलिंगडाला देशासह विदेशातही मागणी आहे़ याशिवाय त्यांच्या माध्यमातून अनेकांनी त्यांनी रोजगार उपलब्ध करुन दिला़ केवळ शिक्षण घेऊन नोकरी करण्यापेक्षा शेतीतून विकास साधता येऊ शकतो, असा विश्वास त्यांना आहे़

Web Title: Sakri's Kalingad goes abroad directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे