दोन वेळेस मुदतवाढ देवूनही आरटीईचे पहिल्या फेरीतील प्रवेश अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 12:18 IST2019-05-11T12:17:33+5:302019-05-11T12:18:39+5:30
धुळे जिल्ह्यातील ६२८ प्रवेश पूर्ण

दोन वेळेस मुदतवाढ देवूनही आरटीईचे पहिल्या फेरीतील प्रवेश अपूर्णच
आॅनलाइन लोकमत
धुळे : आरटीई अंतर्गत वंचीत व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश मोफत देण्याची तरतूद आहे. पहिल्या सोडतीत ८१० विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशासाठी निवड करण्यात आली. १० मे अखेरपर्यंत ६२८ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. प्रवेशासाठी दोनवेळा मुदतवाढ देवूनही पहिल्या फेरीतील प्रवेश पूर्ण होऊ शकलेले नाही.
आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाकरिता धुळे जिल्ह्यातील ९७ शाळांमधील १२३७ जागांसाठी २ हजार ३५५ अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त झालेल्या अर्जांची ८ एप्रिल रोजी पुण्यात सोडत काढण्यात आली होती. त्यात मोफत प्रवेशासाठी ८१० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. प्रवेश घेण्यासाठी पहिल्यांदा ४ मे पर्यंत व नंतर १० मे पर्यंत मुदत वाढ देण्यात आली.
मात्र १० मे अखेरपर्यंत ८१० पैकी ६२८ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले होते. अजुनही १८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत. दरम्यान अजून तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळणार का? की दुसरी सोडत काढण्यात येणार असा प्रश्न पालकांना पडलेला आहे.
दरम्यान पालकांनाही आपल्या पाल्याचा प्रवेश नामवंत शाळेतच व्हावा अशी इच्छा असते. नामांकित शाळेत प्रवेश मिळत नसल्याने, अनेक पालक पाल्याची निवड होऊनही प्रवेश घेत नाही. त्यामुळेही प्रवेश अपूर्ण राहतात असे सांगण्यात आले.
गेल्यावर्षीही चारवेळा दिली होती मुदतवाढ
दरम्यान गेल्यावर्षीही मोफत प्रवेशासाठी चारवेळा मुदतवाढ देण्यात आलेली होती. तरीही पहिल्या फेरीतील प्रवेश पूर्ण होऊ शकले नव्हते.