धुळे जिल्ह्यातील गटांच्या फेररचनेमुळे अनेकांची संधी हुकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 18:53 IST2019-11-26T18:53:27+5:302019-11-26T18:53:50+5:30
राज्यातील सत्तेचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर हालचाली वाढतील

धुळे जिल्ह्यातील गटांच्या फेररचनेमुळे अनेकांची संधी हुकणार
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी यावर्षी गटांची थोडेफार फेररचना करण्यात आलेली आहे. या फेररचनेचा अनेकांना फटका बसू शकतो. तर गेल्यावेळी पदावर असलेल्या काही पदाधिकाऱ्यांचे गट आरक्षित झालेले असल्याने, त्यांनाही दुसºया गटाचा शोध घ्यावा लागणार आहे.
जिल्ह्यात ५६ गट आहे. त्यापैकी १५ गट सर्वसाधारण, २३ गट अनुसूचित जमाती, १५ गट नागरिकांचा मागासप्रवर्ग व ३ गट अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहेत.
धुळे तालुक्यात पूर्वी १७ गट होते. मात्र तालुक्यातील काही गावांचा महानगरपालिकेत समावेश झाल्याने, वरखेडे, मोराणे प्र.ल., वलवाडी, बाळापूर हे पूर्वीच चार गट बाद झाले आहेत. मात्र मुकटी व बोरविहिर हे नवीन गट तयार करण्यात आलेले आहे. तालुक्यातील गटांची संख्या १५ वर आलेली आहे.
शिरपूर तालुक्यात पूर्वी १३ गट होते. आता या तालुक्यातील गटांची संख्या १४ झालेली आहे. या तालुक्यात ंिशंगावे, विखरण बु्रदुक, हे नवीन गट तयार करण्यात आलेले आहेत. तर बभळाज ऐवजी हिसाळे तर थाळनेर गटाचे विभाजन करून मांजरोद गट तयार करण्यात आलेला आहे.
शिंदखेडा तालुक्यात पूर्वी ९ गट होते, आता त्यांची संख्या १० झालेली आहे. या तालुक्यात वर्षी हा नवीन गट अस्तित्वात आलेला आहे. या गटात बाम्हणे ऐवजी धमाणे हा गट झालेला आहे.
साक्रीत चार गटांचे विभाजन
साक्री तालुक्यात १७ एवढी गटसंख्या कायम आहे. मात्र काही गटांची फेररचना झालेली आहे. जैताणे गटाचे विभाजन करून दुसाणे गट तयार केला. दहिवेल गटाचे विभाजन करून बुरूडखे, तर पिंपळनेर गटाचे विभाजन करून सुकापूर, कासारे गटाचे विभाजन करून शेलबारी व साक्री गटाचे विभाजन करून भाडणे हे गट तयार केले आहेत.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गटांचे विभाजन झाल्याने, तसेच काही गट राखीव झाल्याने, जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्यांची कोंडी झालेली आहे. या इच्छुकांनाही आता नवीन गटांचा शोध घ्यावा लागणार आहे. तर काही काहींची इच्छा असूनही गटांच्या विभाजनामुळे संधी हुकण्याची शक्यता आहे. आता कोणाला कोणत्या गटातून प्रतिनिधीत्व करता येवू शकेल हे पुढील आठवड्यात स्पष्ट होणार आहे. ार्यंत कोणता पक्ष नेमका कोणासोबत आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर राजकीय चित्र स्पष्ट होईल.