रेमेडिसिविरपाठोपाठ म्युकरमायकोसिसचे इंजेक्शनही मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:34 IST2021-05-15T04:34:42+5:302021-05-15T04:34:42+5:30
धुळे - कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे. कोरोनामुक्त झालेल्या अनेक रुग्णांना हा बुरशीजन्य आजार होत ...

रेमेडिसिविरपाठोपाठ म्युकरमायकोसिसचे इंजेक्शनही मिळेना
धुळे - कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे. कोरोनामुक्त झालेल्या अनेक रुग्णांना हा बुरशीजन्य आजार होत आहे. म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासोबतच या आजारावर प्रभावी असलेल्या इंजेक्शन व औषधांची टंचाई निर्माण झाली आहे. धुळे शहरातील एकाही मेडिकलमध्ये म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळले आहे.
जिल्ह्यात मार्चपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू झाला होता. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तीव्र होती. पहिल्या लाटेत शहरात रुग्ण आढळण्याची प्रमाण जास्त होते तर दुसऱ्या लाटेत मात्र ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळले आहेत. पहिल्या लाटेत धुळे शहर व शिरपूर तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. यावेळी मात्र साक्री तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या जास्त होती तसेच पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक होते तर तरुणाई दुसऱ्या लाटेत होरपळली गेली आहे. मागील काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढल्याने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या चिंतेत भर पडली आहे.
डोळे, नाक, जबड्याला फटका -
म्युकरमायकोसिसमुळे जबडे कुजणे, दात हालणे तसेच डोळ्यांची दृष्टी कमी होणे अशी लक्षणे दिसतात. सुरुवातीला दात, डोळे व डोक्याला तीव्र वेदना होतात. काही रुग्णांच्या दात व ओठांना बधीरपणा येतो. डोळ्यांना सूज येणे, वरची पापणी न उघडणे आदी लक्षणे दिसतात. लवकर निदान न झाल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो.
इंजेक्शन, औषधी मिळेना -
१ - एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक असणारे रेमेडिसिविर या इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धडपड करावी लागत असतानाच म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन मिळणे कठीण झाले आहे.
२ - शहरातील जिल्हा रुग्णालय परिसरातील मेडिकलमध्ये म्युकरमायकोसिससाठी आवश्यक असलेल्या लिपोसोमल एम्पोटीसीरीन बी या इंजेक्शनबाबत विचारले असता, इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
३ - लिपोसोमल एम्पोटीसीरीन बी इंजेक्शन यापूर्वी उपलब्ध होते पण आता कंपनीकडून त्याचा पुरवठा होत नसल्याचे देवपूर मधील औषध विक्रेत्याने सांगितले.
मागणी किती, पुरवठा किती
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस आजार होत असल्याने एम्पोटीसीरीन बी या इंजेक्शनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. सध्या दररोज शंभरापेक्षा अधिक इंजेक्शन्सची गरज आहे. मात्र, शहरात कोणत्याच मेडिकलमध्ये ते उपलब्ध नाही.
एका रुग्णाला लागतात ३० डोस -
- म्युकरमायकोसिस झालेल्या एका रुग्णाला लिपोसोमल एम्पोटीसीरीन बी इंजेक्शनचे ३० डोस द्यावे लागतात. काही रुग्णांना तर ३० पेक्षा अधिक डोसची गरज भासते.
- कोरोनाच्या आधी वर्षभरात केवळ १० ते १२ इंजेक्शनची विक्री व्हायची असे विक्रेत्यांनी सांगितले. ४ जहाजावर ५०० ते ६ हजार ८२५ पर्यंत या इंजेक्शनची किंमत आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात -
म्युकरमायकोसिसचा धोका लक्षात घेता कोरोनामुक्त झालेल्या विशेषतः मधुमेह व इतर व्याधी असलेल्या रुग्णांनी मुख आरोग्य तपासणी करून घ्यावी. कारण ऐनवेळेस धावपळ करण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी तसेच दंतरोग तज्ज्ञांनीही दातांच्या तक्रारी घेऊन तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची मुख आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.
डॉ. बी. एम. रुडगी, दंतरोग तज्ज्ञ
रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींना म्युकरमायकोसिस हा आजार लवकर होतो. कोरोनापूर्वी या आजाराचे एका वर्षात केवळ ३ ते चार रुग्ण असायचे. एमपीएनएस एक्सरेद्वारे या आजाराचे निदान व व्याप्ती कळते. तत्काळ उपचार केल्यास धोका टाळता येतो.
- डॉ. नितीन पाटील, नाक घास तज्ज्ञ
कोरोनामुक्त झाल्यानंतर डोळ्यांना सूज आली किंवा पापणी उघडण्यास अडचण होत असेल तर तात्काळ तपासणी करून घ्यावी तसेच मधुमेह, इतर व्याधी व आयसीयू मध्ये जास्त दिवस राहिलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यायला हवी.
डॉ. वैशाली उणे, नेत्ररोग तज्ज्ञ