नरडाण्यात पहाटे सुरक्षारक्षकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 17:56 IST2019-06-09T17:55:57+5:302019-06-09T17:56:25+5:30

मृतदेह आढळला नदीत : लाखो रुपये लंपास

Protective bloodstream | नरडाण्यात पहाटे सुरक्षारक्षकाचा खून

नरडाण्यात पहाटे सुरक्षारक्षकाचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
नरडाणा : नरडाणा येथील नंद कृष्णा केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी रात्रपाळीवर कार्यरत असलेल्या मयूर गणेश सिसोदे या २६ वर्षीय युवकाचा रविवारी पहाटेच्या सुमारास अत्यंत निर्दयपणे खून करण्यात आला़ त्याचा मृतदेह कंपनीच्या जवळील लिम्बडी नदीच्या खड्यात दगडांमध्ये पुरून टाकण्यात आला़ ही घटना सकाळी उजेडात आली़ या घटनेमुळे नरडाणा गावात खळबळ माजली होती़                            
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील रेल्वे स्टेशननजिक मुंबई-आग्रा महामार्गजवळ असलेल्या उड्डाणपुलाखाली श्रीजी वायर व नंद कृष्णा केमिकल अशा एकाच मालकाच्या दोन कंपन्या आहेत़ नरडाण्यासह परिसरातील अनेक युवकांना या दोन्ही कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध झाला आहे़ मयूर गणेश शिसोदे या युवकाला गेल्या अनेक वर्षापासून याच कंपनीत रोजगार उपलब्ध झाला होता़ अवघ्या चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या मयूरचा संसार अतिशय आनंदाने व समाधानाने सुरू होता़ नित्यनेमाने शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता मयूर आपल्या कुटुंबाला हसत मुखाने बाय करत कंपनीत कामावर जायला निघाला़ मयूरला याची कल्पना नव्हती की ही रात्री त्याची शेवटची रात्र राहणार आहे़ रात्री इमाने-इतबारे आपल्या ड्युटीवर काम करत आपल्या सोबत असलेल्या कर्मचाºयांसोबत मध्यरात्रीच्या तीन वाजेपर्यंत मयूर गप्पा व हास्यविनोद करीत होता़ तीन वाजेनंतर दोघेही ड्युटीवरती होते़ सहकर्मचारी हा पुढच्या गेटवरील श्रीजी वायर कंपनीत होता़ दोघेही पुढे आणि मागे असे विभागले गेल्यावर सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मयूरला बोलवण्यासाठी गेलेल्या सहकर्मचाºयाला मयूर मात्र त्याठिकाणी आढळला नाही़ दरवाज्याजवळ मयूरच्या चपला, गाडीची चावी व मोबाईल पडलेला दिसल्यावर सहकर्मचारी घाबरला़ आतमध्ये जाऊन बघतो तर काय कंपनीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून लॉकरमध्ये ठेवलेले पगाराच्या वाटपासाठी आलेले लाखो रुपये लंपास झालेले दिसले़ 
त्याने ताबडतोब कंपनीच्या अधिकाºयांना घटनेची माहिती दिली व कंपनीचे व्यवस्थापक आशिष कुलकर्णी हे घटनास्थळी दाखल झाले़ तोपर्यंत गावात मयूर बेपत्ता झाल्याची वार्ता वाºयासारखी पसरली़ मयूरच्या नातेवाईकांनी व मित्रांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली़ सर्वच ठिकाणी मयुरचा शोध घेताना अचानक एका आप्तेष्टाला रक्ताचे डाग कंपनीच्या कंपाउंडमागे आढळून आले़ त्या रक्ताच्या थेंबांचा मागोवा घेत-घेत पुढे गेलेल्या मयूरच्या मित्रांना जवळच असलेल्या लिम्बडी नदीच्या खड्यात मयूरचा पाय व हात दिसला़ माती, दगड व त्यावर ठेवलेला चारा सरकविला असता त्याखाली मृत मयूरचे रक्तबंबाळ शरीर होते़ त्याचा मृतदेह तो काम करीत असलेल्या कंपनीत आणण्यात आला़ 
घटनेची माहिती नरडाणा पोलिसांना कळविण्यात आली़ त्यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते़ सुरक्षा रक्षकाच्या खुनाची घटना घडल्यानंतर त्याचे गांभिर्य ओळखून घटनास्थळी श्वान पथकास व ठसे तज्ञांना बोलावण्यात आले होते़ शान पथकाने रेल्वे पुलापर्यंतचा माग दाखविला़ 
दरम्यान, मयूरच्या खुनामागे परिचित व्यक्ती असावा असा अंदाज आहे़ ज्याला कंपनीच्या लॉकरमध्ये पैसे असल्याची माहिती होती़ मयूर हा अत्यंत हसतमुख निर्व्यसनी मुलगा होता़ त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी व छोटा भाऊ असा परिवार आहे़ त्याचे वडील व त्याचा भाऊ  आणि मयूर असे तिघेही जण एकाच कंपनीत काम करत होते़ 

Web Title: Protective bloodstream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.