टॅक्सी सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 15:06 IST2020-08-08T15:06:30+5:302020-08-08T15:06:44+5:30
धुळे : तूर्त अमळनेर, नंदुरबारसाठी सेवा, टॅक्सीत केवळ पाच प्रवाशांना बसण्याची परवानगी

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेली काळी-पिवळी टॅक्सी सेवा अमळनेर व नंदुरबार या मार्गावर सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्यात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तेव्हापासूनच एस.टी.बरोबरच प्रवाशी वाहतूक करणारी टॅक्सी सेवाही बंद झालेली होती.
धुळे येथून अमळनेरसह नंदुरबार, शिरपूर, दोंडाईचा,चाळीसगाव या मार्गावर टॅक्सीची सेवा आहे. दररोज शेकडो प्रवासी या टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करीत होते. त्यामुळे जवळपास १०० पेक्षा अधिक टॅक्सी चालकांना यातून रोजगार मिळत होता. मात्र लॉकडाऊन झाल्याने, टॅक्सीसेवा ठप्प झाली होती. त्यामुळे चालक व मालकांवरही आर्थिक संकट कोसळले होते.
१ जून पासून अनलॉकचा टप्पा सुरू झाल्यानंतर हळूहळू दुकाने, मॉल्स सुरू करण्याबाबत शासनाने सशर्त परवानगी दिलेली आहे. असे असले तरी अजुनही सार्वजनिक वाहतूक सुरू झालेली नाही.
सार्वजनिक वाहतूक सुरू नसल्याने, विविध कामानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झालेली आहे.
अखेर धुळे शहर टॅक्सी मालक व चालक संघटनेतर्फे ३ आॅगस्टपासून अमळनेर व नंदुरबार या मार्गावर टॅक्सीसेवा सुरू करण्यात आल्याचा फलक टॅक्सी स्टॅँडबाहेर लावण्यात आलेला आहे.
दरम्यान ही सेवा सुरू करतांना प्रवाशांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग राहील याची काळजी घेण्यात आली असून काळीपिवळीमध्ये केवळ पाच प्रवाशी बसविण्यात येत आहे. टॅक्सीसेवा सुरू झाल्याने, अमळनेर व नंदुरबारकडे जाणाºया प्रवाशांना तूर्त दिलासा मिळाला आहे.