सव्वाशे वर्षात प्रथमच सव्वा वर्ष पॅसेंजर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:38 IST2021-05-20T04:38:53+5:302021-05-20T04:38:53+5:30
अतुल जोशी धुळे : कोरोनामुळे पहिल्या लाटेपासून दुसरी लाट सुरू होईपर्यंत अनेक गोष्टी अनलॅाक झाल्या. मात्र, धुळे व जळगाव ...

सव्वाशे वर्षात प्रथमच सव्वा वर्ष पॅसेंजर बंद
अतुल जोशी
धुळे : कोरोनामुळे पहिल्या लाटेपासून दुसरी लाट सुरू होईपर्यंत अनेक गोष्टी अनलॅाक झाल्या. मात्र, धुळे व जळगाव जिल्ह्याला जोडणारी, ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली धुळे - चाळीगसाव पॅसेंजर सव्वाशे वर्षात प्रथमच तब्बल गेल्या सव्वा वर्षापासून आजपर्यंत बंद आहे. पॅसेंजर बंद असल्याने, रेल्वेला थोडाथोडका नव्हे तर तब्बल ६ कोटी ३१ लाख ५० हजार रुपयांचा फटका बसल्याची माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली. दरम्यान, दुसऱ्या लाटेनंतरही या पॅसेंजरला ‘ग्रीन सिग्नल’ केव्हा मिळणार हे अद्याप अनिश्चित आहे.
मध्य रेल्वे मार्गावर धुळे - चाळीसगाव हा ब्राॅडगेज रेल्वे मार्ग आहे. या मार्गावर १५ ॲाक्टोबर १९०० रोजी धुळे - चाळीसगाव पॅसेंजर सुरू झाली. धुळे - चाळीसगाव दरम्यान आठ लहान स्थानके असून, ५६.५ किलोमीटरचे अंतर पार करणाऱ्यासाठी पॅसेंजरला सव्वा तासाचा कालावधी लागतो. सुरुवातीला कोळशाचे, नंतर डिझेलचे तर आता इलेक्ट्रीक इंजिनद्वारे ही पॅसेंजर धावत होती. सुरुवातीच्या काळात दोन, नंतर तीन व गेल्या काही वर्षांपासून या पॅसेंजरच्या दररोज चार फेऱ्या होतात. या पॅसेंजरला सर्वसाधारण डब्यांसह मुंबईसाठी चार व पुण्यासाठी दोन आरक्षित बोग्याही जोडण्यात येत असतात. मुंबईसाठी लावण्यात येणारी बोगी चाळीसगावला अमृतसर एक्स्प्रेला, तर पुण्याची बोगी नागपूर - कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसला जोडण्यात येते.
कमी भाडे, आरामदायी प्रवास म्हणून अनेकजण या पॅसेंजरने प्रवास करतात. दररोजच्या चार फेऱ्या व आरक्षण मिळून या पॅसेंजरच्या माध्यमातून रेल्वेला किमान दीड लाखांचे उत्पन्न मिळत होते. दिवाळी व उन्हाळ्यात दररोज किमान दोन लाखांपर्यंत उत्पन्न मिळते.
दरम्यान, देशात कोरानाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गेल्यावर्षी २५ मार्च २०२० पासून देशात लॅाकडाऊन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून ही पॅसेंजर यार्डातच उभी आहे. ३१ मे २०२०पासून अनलॅाकची प्रक्रिया सुरू झाली. टप्प्याटप्प्याने इतर व्यवहार सुरू झाले. रेल्वे प्रशासनाने काही मार्गांवर रेल्वेही सुरू केल्या. मात्र, धुळे - चाळीसगाव पॅसेंजर सुरूच झाली नाही. गेल्या सव्वाशे वर्षात प्रथमच तब्बल ४२१ दिवसांपासून ही पॅसेंजर बंद आहे. पॅसेंजरचे रोजचे सरासरी दीड लाखांचे उत्पन्न गृहीत धरून गेल्या ४२१ दिवसात ६ कोटी ३१ लाख ५० हजार रुपयांचा फटका रेल्वेला बसला आहे. अजूनही ही पॅसेंजर सुरू होण्याच्या कुठल्याही हालचाली नाहीत. त्यामुळे हा तोटा अजून वाढण्याची शक्यता आहे.
दंगलीच्या काळातही पॅसेंजरच्या नियमित फेऱ्या
धुळ्यात गेल्या सव्वाशे वर्षात तीन मोठ्या दंगली झालेल्या आहेत. या दंगली दरम्यानही शहरासह परिसरात अनेक दिवसांची संचारबंदी, कर्फ्यू लावण्यात आलेले होते. मात्र, त्या काळातही पॅसेंजरची एकही फेरी रद्द करण्यात आलेली नव्हती. त्यावेळी प्रवासी संख्या कमी झालेली असली तरी धुळे - चाळीसगाव पॅसेंजरच्या फेऱ्या नियमित होत्या. मात्र, कोरोनामुळे प्रथमच सव्वा वर्षापासून पॅसेंजरला ब्रेक लागलेला आहे.
रेल्वे, बस बंदमुळे प्रवाशांचे हाल
पश्चिम रेल्वे मार्गावर बंद असलेली सुरत - भुसावळ पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, मध्य रेल्वे मार्गावरील धुळे - चाळीसगाव पॅसेंजर अद्याप सुरू झालेली नाही. सध्या लॅाकडाऊनमुळे बसही बंद असल्याने, चाळीसगावकडे जाणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनाने जाण्याशिवाय पर्याय नाही.
धुळे - चाळीसगाव पॅसेंजर
१९ ॲाक्टोबर १९००पासून सुरू
आठ स्थानके
५६.५ किमी अंतर
प्रवासासाठी १ तास १५ मिनिटाचा कालावधी लागतो