भरधाव दुचाकी घसरून एकाचा मृत्यू, शिरपूर तालुक्यातील तरडी गावाजवळील घटना
By देवेंद्र पाठक | Updated: February 8, 2024 16:36 IST2024-02-08T16:35:16+5:302024-02-08T16:36:03+5:30
मच्छिंद्र मोहन शिरसाठ (वय ४९) असे मयत व्यक्तीचे नाव आहे

भरधाव दुचाकी घसरून एकाचा मृत्यू, शिरपूर तालुक्यातील तरडी गावाजवळील घटना
देवेंद्र पाठक, धुळे: भरधाव वेगाने असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने उपचार घेताना मृत्यू झाला. ही घटना शिरपूर तालुक्यातील तरडी गावाच्या शिवारात सोमवारी पहाटे झाली होती. बुधवारी थाळनेर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली. मच्छिंद्र मोहन शिरसाठ (वय ४९, रा. भावेर, ता. शिरपूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
भरधाव वेगाने असलेल्या दुचाकीचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरली. अपघाताची ही घटना शिरपूर तालुक्यातील तरडी गावाच्या शिवारातील पाटचारीजवळ साेमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. दुचाकीवरील चालक मच्छिंद्र मोहन शिरसाठ हे भावेर गावाकडून तरडी गावाकडे येत असताना दुचाकीसह दूरवर फेकले गेले. यात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. फेकल्या गेल्याने मच्छिंद्र यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली. बराच वेळ ते अपघातस्थळी विव्हळत पडून होते. रस्त्त्यावरून वावरणाऱ्यांच्या लक्षात हीबाब येताच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुचाकीची नंबर प्लेट तुटल्यामुळे सुरुवातीला त्यांची ओळख पटली नाही. पण मोटार सायकलीच्या चेसिस नंबरवरुन ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी बुधवारी थाळनेर पोलिस ठाण्यात गौतम मोहन शिरसाठ यांनी दिलेल्या माहितीवरून मोटारसायकल चालक मयत मच्छिंद्र मोहन शिरसाठ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक दीपक पावरा घटनेचा तपास करीत आहेत.