वर्षभरात एकही अपघात नाही, कारखान्यांबद्दल तकार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:08 IST2021-03-04T05:08:13+5:302021-03-04T05:08:13+5:30
४ मार्च हा औद्योगिक सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर माधव रत्नपारखी यांनी धुळे जिल्ह्यातील औद्योगिकस्थितीविषयी सविस्तर ...

वर्षभरात एकही अपघात नाही, कारखान्यांबद्दल तकार नाही
४ मार्च हा औद्योगिक सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर माधव रत्नपारखी यांनी धुळे जिल्ह्यातील औद्योगिकस्थितीविषयी सविस्तर माहिती दिली.
नवीन कामगार कायद्यानुसार २० व त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या कारखान्यांचीच नोंद औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडे करण्यात येत असते. धुळे जिल्ह्यात अशा नोंदणीकृत कारखान्यांची संख्या २८१ एवढीच असून, त्यात काम करणाऱ्यांची संख्या १४ हजार ५०० एवढी आहे. तर धुळ्यातील अवधान एमआयडीसीत फक्त ५३ कारखाने असल्याची या विभागाकडे नोंद आहे.
कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराची सुरक्षा तेथील व्यवस्थापनाने घेणे गरजेचे आहे. या कारखान्यांमध्ये सुरक्षिततेचे उपाय आहेत की नाही या दृष्टीने केंद्रीय निरीक्षण प्रणालीनुसार कारखान्यांना भेटी दिल्या जातात. सुरक्षेच्यादृष्टीने कारखान्यांना सूचना दिल्या जातात. त्रुटी असल्यास त्या पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाते, असे त्यांचे म्हणणे आहे.
एकच धोकादायक कारखाना
जिल्ह्यात केवळ शिरूड येथील कारखानाच धोकेदायक असल्याची नोंद आहे. या ठिकाणी त्रयस्थांकडून ॲाडिट केले जाते. या कारखान्याचाही स्वत:चा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा आहे.
एकही अपघाताची नोंद नाही
जिल्ह्यात असलेल्या कारखान्यांमध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत एकही प्राणघातक अपघात झाल्याची नोंद नाही. अपघातच नसल्याने कोणालाही अपंगत्व आलेले नाही हे विशेष आहे.
अपघाताची तीन महिन्यात चौकशी
कारखान्यात अपघात झाल्यानंतर तीन महिन्यातच त्याची सविस्तर चाैकशी करण्यात येते. त्यानंतर खटला न्यायालयात दाखल करण्यात येत असतो.
कारखान्यात महिला तक्रार निवारण समिती
कारखान्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य दिले जाते. ज्या कारखान्यांमध्ये महिला कामगार आहेत, तेथे महिला तक्रार निवारण समिती असणे गरजेचे आहे. जोपर्यंत ही समिती गठीत होत नाही, तोपर्यंत कारखान्याची नोंदणी, नूतनीकरण होत नाही. जिल्ह्यात ४७ कारखान्यांमध्ये महिला काम करतात. तेथे ही समिती कार्यान्वित आहे.
जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये गेल्यावर्षी एकही अपघात झालेला नाही. तसेच कारखान्यांबद्दल कामगारांची तक्रारही नाही. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची काळजी कारखाना व्यवस्थापनाकडून घेतली जाते.
- माधव रत्नपारखी,
उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग,धुळे