धुळे : धुळे तालुक्यातील नेर शिवारातील म्हसदी फाट्यावरील किराणा दुकान चोरट्याने फोडून रोख रकमेसह २२ हजाराचा मुद्देमाल लांबविला असल्याची घटना शनिवारी पहाटे घडली़ यात चोरट्याने महत्वाची कागदपत्रेही लांबविली आहेत़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़नागपूर - सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील नेर शिवारात साक्रीला लागून असलेल्या म्हसदी फाट्यावर उमेश रघुनाथ जयस्वाल यांचे रघुछाया ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान आहे़ त्यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा नेहमीप्रमाणे दुकान बंद केले आणि आपल्या घरी निघून गेले़ त्यानंतर चोरीची ही घटना शुक्रवारी रात्री ९ ते शनिवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली़ चोरट्याने ही संधी साधून दुकानाच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडले़ दुकानात शिरुन चोरट्याने १० रुपये दराच्या आणि चिल्लर अशी एकूण २० हजार रुपये रोख, २ हजार रुपये किंमतीची सीसीटीव्ही कॅमेराचे दोन डिव्हीआर असा २२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबविला आहे़ याशिवाय चोरट्याने एक बॅग लांबविली असून त्यात महत्वाची काही कागदपत्रे होती़शनिवारी नेहमी प्रमाणे उमेश जयस्वाल आपले दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी तातडीने घटनेची माहिती धुळे तालुका पोलीस ठाण्यात देवून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार चोरट्याविरुध्द भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे़ घटनेचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पी़ एऩ चव्हाण करीत आहेत़
नेरला किराणा दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 22:33 IST