महापौर पदाची संगीत खुर्ची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:41 IST2021-09-12T04:41:12+5:302021-09-12T04:41:12+5:30
धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन मिटला. धुळ्याचे महापौर पद हे पुढील अडीच वर्षासाठी ओबीसीसाठी ...

महापौर पदाची संगीत खुर्ची
धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन मिटला. धुळ्याचे महापौर पद हे पुढील अडीच वर्षासाठी ओबीसीसाठी आरक्षित आहे. महापालिकेत भाजपाची एकतर्फी सत्ता आहे. आकड्याचे गणित बघता तर भाजपाचा महापौर निवडून येणार हे स्पष्ट दिसते. परंतू शेजारील जळगाव महापालिकेत घडलेले सत्तांतराचे नाटक पाहता तसेच धुळ्यात झाले तर असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे साहजिकच आहे. पण एकहाती सत्ता असल्याने भाजपाचा महापौर बसेल हे आजतरी दिसते आहे. पण भाजपातच या पदासाठी अनेक दावेदार आहेत. त्यामुळे नेमकी महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, याबाबत उत्सुकता आहे.सत्तांतर करुन भाजपाने महापालिका काबीज केल्यानंतर महापौर पदावर पाच वर्षात एक वर्ष स्पर्धेत असलेल्या एक - एकाला संधी दिली जाईल, असे ठरले होते. तसेच जाहीर करण्यात आले होते. परंतू महापौर पदाच्या निवडीनंतर कोरोनामुळे संपूर्ण अडीच वर्ष चंद्रकांत सोनार यांच्याकडेच महापौर पदाची सुत्रे राहिली. आता शेवटचे अडीच वर्षात प्रत्येकी एक - एक आणि शेवटी सहा महिने अशी तीन जणांना संधी दिली जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे महापौर पदाच्या अडीच वर्षाच्या संगीतखुर्ची स्पर्धेत पहिले एक वर्ष कोणाचा नंबर पहिला लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या अडीच वर्षात महापौर पदासाठी नगरसेविका प्रतिभा चौधरी आणि नगरसेवक प्रदीप कर्पे ही नावे अग्रभागी आहे. याशिवाय महापौर चंद्रकांत सोनार यांचे चिरंजीव देवेंद्र सोनार,नगरसेवक शितल नवले, माजी सभापती बालीबेन मंडोरे, नगरसेवक हर्ष रेलन अशी स्पर्धेत असलेल्या नगरसेवकांच्या नावांची मोठी यादी आहे. महापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजप पक्ष निरीक्षक म्हणून आमदार प्रविण दटके यांची नियुक्ती झाली असून ते धुळ्यात डेरेदाखल झाले आहे. त्यांनी शनिवारी भाजपा नगरसेवकांची बैठक सुद्धा घेतली. बैठक बंद कमऱ्यात झाली. त्यांनी सर्वांचे विचार जाणून घेतल्याचे समजते. ते निवडीपर्यंत धुळ्यातच मुक्कामी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पुढील अडीच वर्ष महत्वाचे - भाजपाच्या दृष्टीने महापालिकेतील पुढील अडीच वर्ष महत्वाचे आहेत. कारण या अडीच वर्षात त्यांनी काम करुन दाखवावे लागणार आहे. कारण सुरुवातीचे अडीच वर्षात भुमीगत गटारीच्या कामामुळे खोदून ठेवलेले रस्त्याचा विषय खूप गाजत आहे. यात मनपा प्रशासन यासाठी एमजीपीला दोषी धरत आहे. याविषयावर अनेकदा बैठकीसुद्धा झाल्या आहेत. परंतू प्रश्न सुटण्याऐवजी आणखी बिकट झाला आहे. देवपुरातील रस्त्यांची परिस्थिती दयानीय झाली आहे.आता पावसाळ्यात तर या रस्त्यावरुन पायी चालणे देखील कठीण झाले आहे. हा प्रश्न सुटण्याऐवजी खूपच गंभीर झाला आहे. दुसरा प्रश्न आरोग्याचा आहे. शहरातील स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहे. त्यात आता डेंग्यू आणि चिकुनगुणियाच्या रुग्णांची वाढती संख्येने परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यात भाजपाचे खासदार माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ.सुभाष भामरे हे स्वत: चिकुनगुणियाने आजारी आहे. एकूणच आरोग्याच्या प्रश्नातही महापालिका प्रशासन फेल ठरले आहे. याप्रश्नावर तर स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी घरचा आहेर देत आरोग्य प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पण ही नाराजी फक्त लोकांना दाखविण्यासाठीच आहे की काय, असे वाटते. कारण सभा संपल्यानंतर यासंदर्भात त्या नगरसेवकांनीही फाॅलोअप घेतला नसल्याचे दिसते. कारण प्रश्न सुटलेला नसून जैसे थे आहे. त्यामुळे या सर्व कारणामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर करुन शहरातील रस्ते चांगले करुन आरोग्य व्यवस्था चांगली करण्याची मोठी जबाबदारी या नवीन महापौरावर असणार आहे. कारण या कामाच्या जोरावरच त्यांना लगेच जनतेसमोर निवडणुकीसाठी जावे लागणार आहे.