पंचासमक्ष गुन्ह्यातील हत्यारे संशयितांनी काढून दिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 22:09 IST2020-01-27T22:08:23+5:302020-01-27T22:09:19+5:30
राईनपाडा हत्याकांड : विशेष सरकारी वकील उज्वल निकमांची उपस्थिती, आज पुन्हा कामकाज

पंचासमक्ष गुन्ह्यातील हत्यारे संशयितांनी काढून दिली
धुळे : राईनपाडा सामुहिक हत्याकांडातील संशयित आरोपीनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार पंच राजेंद्र पोपट देसले यांच्या समक्ष काढून दिल्याची साक्ष धुळेन्यायालयात नोंदविण्यात आली़ याप्रकरणी शासनाने नियुक्त केलेले सुप्रसिध्द सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित होते़ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ उगले यांच्या न्यायालयात कामकाज सुरु आहे़ याप्रकरणी पुढील कामकाज २८ जानेवारी रोजी होणार आहे़
साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात १ जुलै २०१९ रोजी किडनीसाठी मुले पळविणारी टोळी आल्याच्या संशयावरुन गोसावी डवरी समाजातील भिक्षेकरु असलेल्या पाच जणांची जमावाने ठेचून निर्घुण हत्या केल्याची दुर्घटना घडली होती़ ग्रुप ग्रामपंचायत व कार्यालयाबाहेर हे हत्याकांड झाले़
या हत्याकांडातील मृतांमध्ये दादाराव श्यामराव भोसले, भारत शंकर भोसले, राजू श्रीमंत भोसले, भारत शंकर माळवे, अगनू श्रीमंत हिंगोले (रा़ खवे, ता़ मंगळवेढा जि़ सोलापूर) या पाच जणांचा समावेश आहे़ क्रुरतेची परिसिमा गाठणाऱ्या या अमानुष घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती़
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाºया आणि समाजमन सुन्न करणाºया साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे पाच जणांच्या निर्दयी खून प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ उगले यांच्या न्यायालयात कामकाज सुरु आहे़ सरकार पक्षाकडून सरकारी वकील अॅड़ उज्वल निकम कामकाज पाहत असून बचाव पक्षाकडून अॅड़ दिलीप पाटील, अॅड़ निलेश मेहता, जळगावचे अॅड़ विजय रवंदळे सोमवारी पार पडलेल्या कामकाजावेळी उपस्थित होते़
सोमवारी साक्री पंचायत समितीचे कर्मचारी तथा पंच राजेंद्र पोपट देसले यांची सर आणि उलट तपासणी घेण्यात आली़ राईनपाडा हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपींनी घटनेत वापरलेले हत्यार, यामध्ये लोखंडी सळई, लाकडी दांडके, पॅन्ट, कपडे, चप्पल अशा विविध वस्तू संशयितांनी कांद्याची चाळ, उर्किरडा, घर अशा विविध ठिकाणी लपवून ठेवले होते़ ते सर्व पंच तथा साक्री पंचायत समितीचे कर्मचारी राजेंद्र पोपट देसले यांच्या समक्ष काढून दिल्याची साक्ष देसले यांनी न्यायालयात दिली़ देसले यांची सरतपासणी अॅड़ उज्वल निकम यांनी केली़ तर लागलीच अॅड़ निलेश मेहता यांनी त्यांची उलटतपासणीही घेतली़ याप्रकरणी पुढील कामकाज २८ जानेवारी रोजी होणार आहे़ यावेळी कोणाची साक्ष नोंदविली जाईल, याची उत्सुकता आहे़