शहरातील प्रमुख रस्ते, चौकात फेरीवाला व्यावसायिक बसतात. विविध ठिकाणी भाजी बाजारही भरतो. आग्रारोड, पारोळा रोडवर प्रामुख्याने दोन्ही बाजूने फेरीवाले उभे राहतात. आता शहरातील सर्व फेरीवाला व्यावसायिकांची नोंदणी महापालिकेने सुरू केली आहे. आतापर्यंत १ हजार ५०० व्यावसायिकांची नोंदणी झाली. गेल्या अनेक वर्षांपासून मनपाकडून हाॅकर्स झोनचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे अनेक शहरातील फेरीवाला व्यावसायिकांचा रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होते. अनेकांनी तात्पुरते स्वरूपात व्यवसायदेखील थाटले आहे. त्यात भाजी विक्रेते विविध वस्तू विक्रेते, कपडे, कटलरी, चप्पल, बेडशिट, ब्लँकेट विक्रेते आहेत.
महानगरात कोरोना संसर्ग वाढू नये, रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना हक्काची जागा मिळावी तसेच महापालिकेला व्यावसायिकांच्या माध्यमातून करवसुली करता, यासाठी सध्या महापालिकेकडून हाॅकर्स झोनसाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून फेरीवाला व्यावसायिकांची नोंद करण्यात येत आहे. मोबाइलमध्ये ऑनलाइन जागेवर जाऊन नोंदणी केली जात आहे. फेरीवाल्याचे नाव, ठिकाणी, व्यवसायाची माहिती घेऊन जिओ टॅगिंग करण्यात येत आहे. या पद्धतीने महिनाभरात १ हजार ५०० फेरीवाला व्यावसायिकांची नोंदणी करण्यात आली आहे. ही नोंदणी करण्याचे सुरूच असून, शहरात साधारणपणे ३ ते ४ हजार फेरीवाला व्यावसायिक आहेत. त्याची नाेंदणी करण्याचे काम काही दिवसात पूर्ण होणार आहे.
असे आहेत महानगरातील हॉकर्स झोन
हॉकर्स झोन- आनंद नगर, देवपूर, गल्ली क्रमांक ४ मधील सन्मान लॉज ते नगरपट्टी, कारागृहासमोरील रस्ता, पाटबाजार ते आपला महाराष्ट्र कार्यालयपर्यंत नगरपट्टी़
नो हॉकर्स झोन-शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा (संपूर्ण आग्रारोड), गल्ली क्रमांक २ गोल बिल्डिंग ते नवग्रहीपर्यंतचा रस्ता, झाशी राणी पुतळा ते पारोळा रोडवरील शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत, गल्ली क्रमांक १ मधील शिवाजी महाराज पुतळा ते राजवाडे बँक चौकापर्यंत, जयहिंद ज्युनियर महाविद्यालय ते इंदिरा गार्डनपर्यंतचा रस्ता व चौपाटी ते जयहिंद सिनियर महाविद्यालय (वाडीभोकर रोड), गणपती मंदिर पुलाजवळील मोराणकर यांचे घराजवळ.